ऐतिहासिक किल्ल्याचे नागरी स्थापत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 07:19 PM2018-04-09T19:19:11+5:302018-04-09T19:21:56+5:30

स्थापत्यशिल्प : तब्बल हजार वर्षे महाराष्ट्रातील इतिहासाचा अविभाज्य अंग बनून राहिलेल्या देवांच्या नगरीचा लिखित इतिहास सुरूहोतो तो यादवांबरोबर. देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूच्या लेण्यांवरून राष्ट्रकुट काळात येथे काही प्रमाणात वस्ती असावी, असा अंदाज आहे.

The civil fortress of the historic fort | ऐतिहासिक किल्ल्याचे नागरी स्थापत्य

ऐतिहासिक किल्ल्याचे नागरी स्थापत्य

googlenewsNext

- तेजस्विनी आफळे

यादवांच्या सेऊन देशातील (नाशिक जिल्ह्यातील भाग) वास्तव्यानंतर भिल्लम पाचवा याने देवगिरीला राजधानीचा दर्जा दिला. ही राजधानी अत्यंत समृद्ध आणि कला-ज्ञान प्रेमी होती यात दुमत नसावे! हेमाद्री, शार्रडधारांसारखे विद्वान अधिकारी, खोलेश्वरासारखा ज्ञानी, मुत्सद्दी सेनापती आणि भिल्लम (पंचम), जैतुगी, कृष्णदेव, महादेव असे उत्तम शासक यांच्या सहवासाने देवगिरीची कीर्ती त्यावेळच्या भरतखंडात पसरली नसेल तरच नवल....किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या महाकोटातील वस्तीला कटक देवगिरी असे म्हणत हे तुघलक काळातील लेखांवरून समजते.

येथे मंत्रिगण, सरदार-दरकदार, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती व सैनिकांना राहण्याची व्यवस्था होती, तर त्यापलीकडे सामान्य प्रजाजनांची वस्ती होती असे म्हणतात. राजघराण्याचे निवासस्थान कालकोटात असावे असे अनुमान आहे. अशीच नागर व्यवस्था पुढील काळातही चालू राहिली असावी, असे १९८० च्या दशकात तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ, डेक्कन कॉलेज आणि भारतीय पुरातत्व खात्याच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या उत्खननात मिळालेल्या घरांची जोती व त्यांच्या रचनेवरून दिसते. शक्तिशाली, ऐश्वर्यसंपन्न, मात्र होयसळ-काकतीयांबरोबरच वर्षानुवर्षे आपली ताकद अजमावत राहिलेल्या यादव राजाला, तेरावे शतक संपता, जणू एखाद्या झंझावाती रात्रीत विद्युल्लता कडाडावी आणि एका क्षणात सगळे बेचिराख व्हावे तसे अल्लाउद्दीनाच्या आक्रमणाने दुर्बल करून टाकले. त्याने अनेक मण सोने, चांदी, हिरे, मोती लुटून नेल्याचे सांगितले जाते. त्यानंतरही पुढेही अशा अनेक लुटींनी या नगरीला जर्जर करून टाकले होते. 

१४ व्या शतकाच्या सुरुवातीला मुबारकशाह खिलजीने यादव राजाचा पूर्ण बीमोड केला. त्यावेळी अतिभव्य पार्श्वनाथ मंदिरासकट अनेक मंदिरांचा विध्वंस करून जामी मशीद म्हणजेच आजची भारत माता मंदिराची उभारणी केली गेली हे इमारतीच्या बांधकामातील यादव शैलीतील दगडी खांबांवरून दिसते. देवाजीच्या नगरीची यादवकालीन गुणवैशिष्ट्ये अधिक सांगणे पुराव्यांअभावी अवघड आहे. काहीच वर्षांनी मोहम्मद बिन तुघलकाला देवगिरीची भुरळ पडली ती परत अशा अगणित संपत्तीकडे पाहूनच आणि त्याने नाव ठेवले दौलताबाद. तुघलकाने आपल्या प्रजेसाठी उत्तम नगरीची व्यवस्था केली असे इब्न बतुता म्हणतो. अनेक मोठे प्रसाद, पाणी साठवण्याचे तलाव, हौद, मशिदी आणि अनेक सुंदर बागा किती आणि काय!! असे म्हणतात की नवीन नगररचना करताना समाजातील प्रत्येक वर्गासाठी वेगळा मोहल्ला स्थापला. तिथे सर्व प्रकारच्या सोयी करून त्या त्या मोहल्ल्यांना जणू स्वयंपूर्ण केले होते. मात्र, लवकरच मोहम्मदाला  दिल्लीकडे प्रयाण करणे भाग पडले. आज दिसणारे चंद-मिनार, बारादरी, रंग-महाल, चिनी महाल, दिवाण-ए- खाससारखा भव्य रचनेचा परिसर आणि त्यालगतचा शहजादी हमाम, पाणी व्यवस्था, बाग-बगीचे नंतरच्या बहामनी व निजामशाही काळात उभारले गेले.

मुघल आणि असफजाही काळात किल्ल्याचा उपयोग बहुतकरून सैन्य ठिकाण आणि तुरुंग असाच झाला. किल्ल्याच्या स्थापत्य वैशिष्ट्यांचा अभ्यास अनेक जाणकार इतिहासतज्ज्ञांनी केला आहेच. मात्र, यादवानंतरच्या नऊशे-हजार वर्षांत तब्बल सहा मुस्लिम राजघराण्यांनी स्थापत्य रचनेत छोट्या-मोठ्या  प्रमाणात जी आपली छाप सोडली त्यामुळे किल्ल्यातील बांधकामशैलीत सरमिसळ झालेली आढळते. ही सरमिसळ अभ्यासकांना आज ही गोंधळात टाकते. तसेच वयोमानपरत्वे झालेल्या किल्ल्यातील पडझडीमुळे अधिकाधिक जोमाने पुरातात्त्विक अभ्यास व्हायला हवा हे परत परत जाणवून देतात.

 ( tejas.aphale@gmail.com)
 

Web Title: The civil fortress of the historic fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.