प्रश्न भूकेचा आहे हो..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:29 PM2018-08-11T16:29:20+5:302018-08-11T16:30:17+5:30

वर्तमान :  ‘भूक’ तशी चिरंतनच. ती फसवी नसतेच कधी. ती फसवतही नाही तुम्हाला, मात्र ती सरळ येते अंगावर. तिला टाळता येत नाही कुणाला; ती असते अटळ, सनातन. ती अडकवते चक्रव्यूहात. तीच घडवते, बिघडवते, तिच्यासाठीच असते धडपड माणसांची; तिचा आगडोंब विझवा म्हणून. तीच ठरते अत्यंतिक गरज जीवनचक्राची. तुम्ही रचत जाता भुकेवर इमले स्वप्नांचे. पण ती नसते त्यांना बांधील. तुम्ही वाढवत जाता तुमच्या गरजा तशी ‘ती’ वाढत जाते कालपरत्वे. शहाणपण येते तिलाही; तेव्हा ती सोडत नाही तुमची पाठ. ती शोधायला लावते तुम्हाला तिला शमविण्याचे अनंत मार्ग. तिला नसतो रंग, गंध, जात-पात, धर्म,पंथ अथवा तुमचं गोत्र, कुळ वगैरे पाहून ठरतही नाही तिचे वर्तन. ती असते मूलत:जैविक. तिचे ते आदिमत्व समजून घेता येत नाही माणसांना. म्हणून ती निर्माण करीत जाते हरघडी नवा गुंता. तेव्हा खुंटतात मार्ग. तिने उग्र रूप धारण केले की संघर्ष अटळ ठरतो. तिने निवडला ‘संगराचा’ मार्ग तर उलथतात भल्याभल्यांच्या गढ्या अन् पालथा पडतो शोषकांचा बुरुज. कारण तीच देत असते हातात ‘धोंडा’ व्यवस्थेच्या दिशेने भिरकावयाला. तेव्हा ती निर्माण करीत जाते गुंतरंगत; तसा नवा गुंता वाढत जातो हरघडी. म्हणून तिने प्रश्न जटिल करण्याअगोदर समजून घेतले पाहिजेत. अन्यथा उपाशीपोटी पचत नाही पुन्हा कोणतेच तत्त्वज्ञान भुकेल्यांना.

Biggest Question is hunger..! | प्रश्न भूकेचा आहे हो..!

प्रश्न भूकेचा आहे हो..!

googlenewsNext

 - गणेश मोहिते

आसमंतात मळभ दाटलेत, रस्त्यांवर मोठमोठ्ठे खड्डे पडलेत अन् माणसांच्या चेहऱ्यावर दुष्काळ. त्यात पावसाचा टिपूस नाही. हवा कोरडी झाली. वेदनांचा आक्रोश रस्त्यांवर आला, धुरांचे लोट आकाशात झेपावू लागले. माणसं गांगरली काही घराघरातच दबा धरून बसली. रस्त्यांवरच्या गाड्या जीव मुठीत धरून ये-जा करतायेत. सगळं कसं अस्वस्थ करणारे. वातावरणात हतबलता, नैराश्य तसा आक्रोशाचा जोर अधिक वाढतो आहे. हा आक्रोश ‘मूक’ असो की ‘ठोक’ व्यवस्थेच्या कानठळ्या बसवणारा. हा कष्टकरी, शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. हा बेकारांचा आकांत आहे. एका जीवघेण्या कोंडीतून बाहेर पडण्यासाठीचा आक्रोश आहे. आक्रोशापलीकडे हातात काही उरले नाही, ही हतबलता आहे. विमनस्क झालेली मनं पोटाच्या आकांताने पारंपरिक जोखडांना टाकून रस्त्यांवर उतरतात तेव्हा त्याच्या तळाशी असलेले प्रश्न समजावून घेतले पाहिजेत. हा प्रश्न भूकेचा तर नाही ना. तो तपासून घेतला पाहिजे. तो कधी निर्माण झाला? त्याचे वय किती? त्याच्याशी आमचा संबंध काय? वगैरे असे म्हणून त्याला आता टाळता येणे नाही; तसे झटपट सोडवता येणे नाही. म्हणून वाढत जाईल गुंता, तो जीवघेणा आहे. त्यातून बाहेर पडण्याचा हुकमी मार्ग असू शकतो एखादाच असे नाही किंवा अमुक तमुक ‘रामबाण’ उपाय ठरेल याचीही खात्री देता नाही.. तरी ‘लढा’ लढलाच पाहिजे. कारण भुकेची लढाई शेवटी आत्मसन्मानाचीच असते. तेव्हा ती निकराने, निग्रहाने लढावीच लागते. परंतु हिंसेने सुटत नसतात प्रश्न याचेही ठेवायला हवे भान.. अन् संयमाने समजावून घेतले पाहिजे प्रश्नांच्या बुडाशी असलेली गुंतागुंत...!
 

व्यवस्थेने, समाजाने ‘ते कोण’आहेत; याचा घेतला पाहिजे शोध. ते का उतरलेत रस्त्यांवर, हा कसला आकांत आहे. तो नेमका कुणी ऐकतेय का? का उगाच फोडला जातोय टाहो. मिळालीच कशी उसंत तुम्हाला भर हंगामात. इतकी कसली अनामिक भीती तुमच्या मनात. कोणत्या झाल्या चुका भूतकाळात. मातीलाच चिटकून वासे मोजत बसलात गावातच एकमेकांचे, तेच तर आले नाही ना अंगलट, की निसर्गाने उगवला तुमच्यावर सूड. की समजली नाही तुम्हाला काळाचीच भाषा, काळाच्या पुढे जाऊन कधी केला का विचार, की अंगावर येणारा काळ समजून घेण्याची कुवत नव्हती तुमच्यात. एक एक माणूस तुमच्यातला संपवत गेला स्वत:ला सलग तीन दशके ....तेव्हा तुम्ही कुठे होतात हो. पुढची अरिष्ट तुमच्यावरच कोसळणार हे माहीत असूनही तुम्ही का बदलली नाही वेळी अवेळी ‘कूस’ जगण्याची. मरणारा मरत गेला, तुम्ही पाहत गेलात सताड उघड्या डोळ्यांनी. फार तर केले काय तुम्ही, सोडले बुडबडे हवेत ते हवेसोबतच निघून गेलेत. याद ठेवा सरकारे येतात जातात, माणसं तितकी बदलतात, प्रवृत्तीचे काय.? तुमच्या उसाचा, कापसाचा, कांद्याचा, तुरीचा, सोयबीन, हरभरा अमुक तमुकच्या भावाचा प्रश्न कायमचाच! तरी उजवतातच तुम्ही मातीची कूस. कारण तिच्याही भुकेचा प्रश्न असतोच अनन्यसाधारण. भुकेला असतो कुठे पर्याय, ती मातीची असो जातीची वा पोटाची..तीच असते अंतिम.. तुमचा संघर्ष तिच्या विरोधातला आहे.

तुमचा संघर्ष शिकू द्या म्हणून आहे, तसा बेकारी विरुद्ध आहे. अन् शेवटी तुम्हाला लुटलेल्या टोळ्यांच्या विरोधाचाही आहे... एक प्रसंग...कालचाच. किलकिल्या डोळ्यांनी पोर समोर उभं राहील. मनातील गोष्ट ओठावर आणण्यासाठी धडपड केली. दु:ख सांगू की नको संकोच चेहऱ्यावर. मनात जिद्द परिस्थितीशी दोन हात करण्याची. लढता लढता जिंकण्याची. कुठून आलात अमुक तमुक गावातून. काय करतात वडील? तोच प्रश्न. काही करत नाही..का शेती नाही का? आहे, दोन एकर. मग, काय येतं त्यात कुसळं, तुम्हीच सांगा.. आधुनिक शेती वगैरे केली तर.. मध्यमवर्गीय सूचना. होय खरंय तुमचं, तोच विचार केला होता बापाने, पण मोठ्या दोन बहिणींचे लग्न अंगावर. म्हणून शेतात विहीर खोदली. पाणी लागलं, आधुनिक शेती फॅड केली. बँकेचे कर्ज, शेततळे, पाईपलाईन सगळं करून लावली ‘पपई’ दोन एकरात. ‘बाग’ चांगली आली. मी दहावीला होतो त्या साली, परीक्षा चालू त्याच महिन्यात गारपीट झाली. घराचे कंबरडे मोडले. ‘पीक’ गेले त्याचे काय नाही वाटत. पण ‘बाप’ नाही सावरला त्या धक्यातून. वेडा होऊन फिरतो बांधाबांधाने. सारख्या चकरा मारत असतो शेतशिवारात अन्  बोलत असतो ढगांशी. मलाच सांगा तुम्ही मी आता काय करू.. शिक्षणाने माझे प्रश्न सुटतील असे म्हणते माय, पण खरंच सुटतील काय? असले प्रश्न कायमच करत जातात निरुत्तर.

‘वेळ मोठी वाईट असते’. हे असले करुण बोल एक कोवळा एकोणीस वर्षांचा पोरगा बोलत होता कालच; तेव्हा गलबलून आले. म्हटलं तू शिक तुला करू मदत आम्ही पण...शिक्षणानंतर पुढचे काय! या प्रश्नाचे उत्तर नाही देता येत तुला आज.. कोण घेईल हमी.. असेच असंख्य प्रश्न आहेत आमच्या भवताल. हे ‘प्रश्न’ भुकेचे आहेत हेच आम्ही मान्य करायला तयार नाहीत. आम्ही लावतो फुटपट्या याला जातीपातीच्या आणि घोटतो गळा तारुण्याचा..म्हणून कित्येक स्वप्नं आज उतरलीत रस्त्यांवर...ती काही बोलू पाहतात, त्यांना समजावून घ्या, त्यांच्या आक्रोशाला वाट करून द्या. हवे तर त्यांना विश्वास द्या, सांगा व्यवस्थेला ओरडून हा प्रश्न जातीचा नाही तर भुकेचा आणि भाकरीचा आहे म्हणून...तो आता सोडायलाच हवा.. कारण ‘भूक’ वेडी होणं कोणाच्याच हिताचे कधीच नसते; हे तितकेच खरे..!!
( dr.gamohite@gmail.com )

Web Title: Biggest Question is hunger..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.