करिअर निवडताना सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:50 PM2018-06-16T18:50:32+5:302018-06-16T18:52:57+5:30

प्रासंगिक : निकाल लागताच पालकांना आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात करिअर प्लॅनिंगचे. जे विद्यार्थी कॉलेजच्या उंबरठ्यावर असतात त्यांना प्रश्न असतो कोणता कोर्स निवडायचा? पदवी पास झालेल्यांपुढे प्रश्न असतो जॉबचा. दोन्ही वेळात एका विचित्र संभ्रमावस्थेतून पाल्याला व पालकांना जावे लागते. आर्थिक मंदीमुळे सर्वच क्षेत्रात अस्थिरतेची परिस्थिती आहे. खरे तर हे कधी ना कधी होणारच होते. गेल्या दशकात ‘आय.टी.’ या दोन शब्दांचे नको तितके स्तोम माजवले गेले. अभ्यासक्रमाची वा करिअरची निवड म्हणा सगळीकडे आयटीची धूम! वास्तविक पाहता हा कृत्रिम बुडबुडा केव्हा ना केव्हा फुटणारच होता; परंतु भरपूर पगार, लॅपटॉप, एअरकंडिशनड् केबिन्स, सारखे विमानप्रवास, स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य, अवांतर सोयी-सवलती यामुळे तरुण लालची बनले. पदवी कुठलीही चालेल; पण आयटी टूल्सशी खेळता यायला हवे. मग तुम्ही करिअरच्या पायऱ्या भरभर वर चढायला मोकळे.

Be careful when choosing a career! | करिअर निवडताना सावधान!

करिअर निवडताना सावधान!

googlenewsNext

- विजय पांढरीपांडे

व्यवसायिक क्षेत्रातल्या जीवघेण्या स्पर्धांमुळे सर्वांचीच मन:शांती लयाला गेली. त्याचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाला. अधिक पैसा, अधिक काम, अधिक व्यस्तता, म्हणजे घराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष, गृहशांतीवर परिणाम व्हायला लागला. घटस्फोटाची संख्या वाढली. एकीकडे धार्मिक राजकीय दहशतवाद बोकाळला, तर दुसरीकडे आर्थिक, व्यावसायिक आतंकवाद वाढला. ‘सत्यम’सारखी प्रकरणे उघडकीस आली. निष्पाप तरुणांच्या स्वप्नांशी खिलवाड! आता सर्वत्र कंपन्या सावध झाल्या. सामान्य माणसाला मात्र काय करावे सुचेनासे झाले. 

आजही बारावीनंतर पालकांपुढे, विद्यार्थ्यांपुढे प्रश्नच प्रश्न. कोणता कोर्स निवडायचा? कोणत्या दिशेला जायचे? खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसची संख्या भरमसाठ वाढली आहे. खाजगीकरणामुळे गुणवत्ता वाढेल ही अपेक्षा होती. ती मोजक्या संस्थेत मोजक्या ठिकाणी वाढलीही; पण खाजगीकरणाचा परिणाम शिक्षणाचे व्यापारीकरण होण्यातच अधिक झाला, हे कटू सत्य आहे. अनेक संस्थांचे इन्फ्रास्ट्रक्चर बाहेरून छान दिसत असते, तरी शिकवण्याच्या बाबतीत आनंद आहे. कॉलेजेसची संख्या वाढली तर त्या प्रमाणात प्राध्यापक हवेत, आयटीला प्राधान्य देणाऱ्या तरुण वर्गाने प्राध्यापकीकडे नेहमी पाठच फिरवली. कारण शिकवणाऱ्या मास्तरचा पगार कमी! आयटी कंपन्यांच्या पगाराशी लेक्चररच्या पगाराची तुलना हास्यास्पद अशी परिस्थिती. त्यामुळे आज तरी इंजिनिअरिंगचे क्षेत्र निवडताना आपल्याला कोणत्या क्वालिटीचे शिक्षक आणि शिक्षण मिळणार आहे याचा आधी साकल्याने विचार करावा.

आर्टस्, कॉमर्सपेक्षा इंजिनिअरिंग चांगले, कारण इंजिनिअर्सना ‘भाव’ चढा. या भ्रामक कल्पनेचे आपण शिकार! खरे पाहिले असता कोणताही कोर्स हा चांगलाच असतो. इथे आपल्याला नेमकी कसली आवड आहे, हे बघणे महत्त्वाचे. पालकांची इच्छा त्याची आवड या गोष्टींना बळी पडू नये. पालकांनी देखील दुसरे अमूक करतात म्हणून आपल्याही पाल्याने तेच केले पाहिजे ही जिद्द बाळगू नये. आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता, आवड-निवड, इच्छा काय हे बघणे जास्त महत्त्वाचे. जबरदस्तीने न पेलणाऱ्या कोर्सला घातले तर पुढे जड जाते. भविष्य बर्बाद होते. कारण इंजिनिअरिंग वगैरे कोर्सेसची फी व इतर खर्च इतका भरमसाठ असतो की तिथून माघार घेणे परवडणारे नसते.

मेडिकल कोर्सचेही व्यापारीकरण झाले आहे. शिकवायला चांगले डॉक्टर, प्राध्यापक नाहीत. तपासायला पेशंटस् नाहीत, हॉस्पिटलमध्ये हव्या त्या सोयी-सुविधा नाहीत. फी मात्र लाखाच्या घरात. शिवाय फक्त एमबीबीएस होऊन चालणार नाही. मग सुपर स्पेशालायझेशन हवे. स्वत:चा दवाखाना हवा. हा आर्थिक गुणाकार कंबरडे मोडून टाकतो. हाती जे लागते त्यापेक्षा खूप गमावलेले असते. मॅनेजमेंट शिक्षणाचीही लाखाच्या घरात फी. इथल्या हायफाय एअरकंडिशनड् क्लासरूमला मुलगा शिकतो किती अन् काय, हा संशेधनाचा विषय ठरू शकतो.

शिक्षणाचे व्यापारीकरण हे राजकारणी मंडळींनी या क्षेत्रात धुडगूस घातल्यामुळे झालेले आहे. अभिमत विद्यापीठाचा, स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा एकदा मिळाला की आपल्यावर कुणाचे बंधन तर नाहीच, शिक्षण ‘नंगानाच’ करण्याचे स्वातंत्र्य मिळाले, अशी मॅनेजमेंटची समजूत होते. मग भरमसाठ विद्यार्थ्यांना प्रवेश, भरमसाठ फी असा सगळा अनियंत्रित कारभार करण्यास राजकारणी शिक्षणसम्राट मोकळे असतात. आश्चर्य म्हणजे विद्यार्थी शिकले सावरलेले पालकदेखील या भूलथापांना दिखाव्याला बळी पडतात. एकदा लाखाची इथे फी भरली की नापास होण्याचा प्रश्नच येत नाही! पदवी निश्चित ठरलेली.

पण या पदवीच्या कागदाचे व्यवहारात बाहेरच्या असली जगात किती महत्त्व आहे, हा विचार कुणी करीत नाही. प्रत्येकाला आपल्या पाल्याचे भवितव्य महत्त्वाचे वाटते आणि त्यासाठी पालक वाट्टेल ते करायला तयार होतात. सावधानतेचा इशारा देण्याचे कारण असे की, अनेक शिक्षणसंस्था बोगस आहेत. अनेक विद्यापीठांना मान्यता नाही. अनेक संस्थांना नवनवे घोषित केलेले कोर्सेस चालविण्याची परवानगी नाही. त्यामुळे हे शिक्षण, या पदव्या नोकरीच्या, उच्च शिक्षणाच्या दृष्टीने कुचकामाच्या ठरतात. मास्तरकीची नोकरी मिळते म्हणून अनेक जण खाजगी संस्थांतून बी.एड., एम.एड. करतात. तिथेही मान्यतेचा तपास करणे गरजेचे आहे. एरवी हजारो, लाखो रुपये वसूल केले जातात अन् शेवटी फसवणूक होते.

त्यामुळे कोर्स व करिअरची निवड करताना नेमके काय हवे, आपली बौद्धिक क्षमता किती आहे, आर्थिक परिस्थिती काय आहे याचा सर्वागीण विचार व्हावा. मित्राचा, शिक्षणतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. त्यानंतर कॉलेज कोर्स निवडताना संस्थेची मान्यता, दर्जा हे तपासून घ्यावे. प्रिन्सिपॉल किंवा संस्थेचे सेक्रेटरी यांच्या तोंडी आश्वासनांना, भूलथापांना बळी पडू नये. इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या बाबतीत ‘आॅल इंडिया कौन्सिल आॅफ टेक्निकल एज्युकेशन’ची (एआयसीटीई) मान्यता लागते. विद्यापीठाचे आॅफिलिएशनही लागते. 

विद्यापीठाचा दर्जा यूजीसीकडून प्राप्त करून घ्यावा लागतो. एरवी संस्थेच्या पदवीला, कोर्सेसना मान्यता नसते. असेच सगळे सोपस्कार मेडिकल, फार्मसी अन् इतर कॉलेजेस उघडण्यासाठी आवश्यक असतात. ज्यांनी त्या संस्थेतून पूर्वी शिक्षण/पदवी घेतले आहे त्यांच्याकडे चौकशी करावी. म्हणजे प्रयोगशाळा व्यवस्थित आहेत की नाहीत, प्राध्यापकांची संख्या, गुणवत्ता योग्य आहे की नाही याची देखील माहिती घ्यावी. घाईगर्दीने घेतलेले निर्णय धोकादायक ठरतात. नंतर पश्चात्तापाची वेळ येते. योग्य संस्थेचे कोणेही शिक्षण, कोणतीही पदवी आपण गांभीर्याने घेतली, परिश्रम करून अभ्यास केला तर करिअरमध्ये वर जाण्यास तुम्हाला कुणी थांबवू शकणार नाही. सध्याचे रिसेशनदेखील नाही! त्यासाठी प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलणे मात्र गरजेचे आहे. 

(लेखक माजी कुलगुरू आहेत)

Web Title: Be careful when choosing a career!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.