मी पाहिलेली अस्मितादर्श चळवळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:00 PM2018-03-27T13:00:23+5:302018-03-27T13:13:24+5:30

अस्मितादर्श : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित्याचं सोनं करावं, ते पानतावणे सरांनीच.

'Asmitadarsh' - The spectacular movement I saw | मी पाहिलेली अस्मितादर्श चळवळ 

मी पाहिलेली अस्मितादर्श चळवळ 

- स. सो. खंडाळकर

डॉ. गंगाधर पानतावणे आणि अस्मितादर्श चळवळ हे जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू. ही चळवळ मला जवळून पाहता आली. दरवर्षी होणार्‍या अस्मितादर्श साहित्य संमेलनाला हजेरी लावता आली. ८० च्या दशकात उल्हासनगरला झालेल्या संमेलनापासून मी डॉ. पानतावणे सरांशी जोडला गेलो. व रुढार्थानं विद्यार्थी नसतानाही मला विद्यार्थ्यांसारखं पानतावणे सरांच्या छत्रछायेत वावरता आलं.

अस्मितादर्श त्रैमासिक, दरवर्षी होणारे अस्मितादर्श साहित्य संमेलन हे पानतावणे सरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग. ही चळवळच सरांनी उभी केली. त्यासाठी ते अहोरात्र कष्ट घेत राहिले. हे कष्ट मी जवळून पाहिले. संमेलन आखीव - रेखीव व्हायला हवं, यावर सरांचा खूप भर असायचा. वेगवेगळ्या परिसंवादाचे विषय काय असावेत, तत्क़ालिन परिस्थितीचं प्रतिबिंब त्यात कसं पडेल, हे अत्यंत बारकाईनं सर पाहत असत. ज्या गावात, शहरात संमेलन होत असे, तिथल्या संयोजन समितीशी उत्तम संपर्क, संवाद ठेवून ही संमेलनं सरांनी यशस्वी करुन दाखवली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता’ या अत्यंत जिव्हाळ्याचा विषयावर डॉ.गंगाधर पानतावणे यांची पीएच.डी. लोकमतचे तत्कालिन कार्यकारी संपादक म.य. ऊर्फ बाबा दळवी यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं. त्यावेळी बाबा नागपुरात होते. या पीएच. डीच्या अनुषंगानं चर्चा करायला अनेकदा पानतावणे सर नागपूरला यायचे. तिथल्या जीवनछाया अपार्टमेंटमधील बाबांच्या त्यावेळेसच्या निवासस्थानी या चर्चा होत असत. त्या  जवळून ऐकण्याची संधी मला मिळत गेली. त्यातूनच  सरांचा परिचय व आदर  वाढत गेला. पुढे लोकमतच्या निमित्तानं औरंगाबादला आल्यानंतर यात सतत भरच पडत गेली. लक्ष्मीकॉलनीतील व आताच्या श्रावस्ती निवासस्थानी सतत जाणं होऊ लागलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं तत्त्वज्ञान, दलित साहित्याची चळवळ, अस्मितादर्शच्या माध्यमातून नवोदितांना सरांचा सतत लागणारा हात, त्यांना मिळणारं प्रोत्साहन, हे सारं अद्भुतच. ते मला अनुभवता आलं. नवोदित साहित्यिकांच्या तुटक्या- फुटक्या साहित्याचं सोनं करावं, ते पानतावणे सरांनीच. कवितासंग्रहाच्या मथळ्यापासून ते कवितेच्या आशयापर्यंतचं सारं मार्गदर्शन सर भरुभरुन करीत असत. त्यातूनच एक पिढी घडली. आजही महाराष्ट्रभर ‘ गुरुवर्य’ म्हणून सरांचा  अभिमानानं उल्लेख करणारी पिढी दिसून येते. सरांनी अस्मितादर्श चळवळ मोठी केली. त्यासाठी कुठलीच राजकीय अस्पृश्यता पाळली नाही. सर्वांचं सहकार्य घेत घेतच त्यांनी ही चळवळ मोठी केली. हे कसब फार मोलाचं. ते सरांना लीलया जमलं होतं. 

Web Title: 'Asmitadarsh' - The spectacular movement I saw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.