स्थापत्यरचनेचा आविष्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 03:31 PM2017-12-18T15:31:44+5:302017-12-18T15:31:44+5:30

स्थापत्यशिल्पे : कल्याणी चालुक्य काळात नळदुर्ग कसा असेल याचे ठोस पुराव्यांअभावी अंदाज बांधणे आज अवघड आहे. मात्र, बहामनी काळातील भक्कम केलेला आणि आदिलशाही काळात आगळे-वेगळे पैलू पाडण्यात आलेला हा भूदुर्ग दुर्ग-स्थापत्याचा एक महत्त्वपूर्ण आविष्कार आहे, हे वादातीतच!

Architecture inventions | स्थापत्यरचनेचा आविष्कार 

स्थापत्यरचनेचा आविष्कार 

googlenewsNext

-  तेजस्विनी आफळे

बालाघाट रांगांच्या दक्षिण टोकावर, नळदुर्ग गावाच्या उत्तरेकडून पूर्वेकडे वाहत जाणाºया बोरी नदीच्या प्रवाहाने बनलेल्या दरीमध्ये अक्षरश: घुसलेल्या बसाल्ट दगडाच्या कमी उंचीच्या टेकडावर नळदुर्ग किल्ला निर्मिलेला आहे. या टेकाडाची उंची गावाच्या दिशेला अजून कमी आहे. किल्ल्याला गावाच्या व पाणवठ्याबाजूच्या अशा दोन पश्चिम दिशेच्या तटबंदी दुहेरी आहेत, तर इतर बाजू एकेरी तटबंदीने सुरक्षित केल्या आहेत. एकूण सुमारे २.५ किलोमीटरच्या परिघात ११४ बुरूज आहेत. यामध्ये छोटे बुरूजच म्हणता येतील अशा नऊ पाकळ्या एकत्र बांधून रचलेल्या नव-बुरूज किंवा नौ-बुरजांची स्थापत्यरचना काही औरच... या बुरुजांच्या प्रत्येक पाकळीतून छोट्या शतुर्गल तोफांनी जमिनीवर दूर अंतरावर मारा करता यावी यासाठी छोट्या खिडक्या आहेत. तसेच बुरजाचा मध्यभाग अजून एक मजला उंच चढवून तेथेसुद्धा तोफा ठेवण्यासाठीची गोलाकार रचना आदिलशाही स्थापत्यकारांच्या कौशल्याची परिसीमाच मानली जाते. दोन्ही बाजूला असणारे आकाराने छोटे गोलाकार मात्र तोफांनी सुसज्ज बुरूज नव-बुरजाची संरक्षण क्षमता अजूनच वाढवतात. उत्तरेला असणाºया परंडा बुरजासारख्या इतर विविध आकार व घडणींच्या बुरजांवर तोफा ठेवण्यासाठी केलेल्या रचना आजही बºयापैकी शाबूत आहेत.

किल्ल्याच्या उत्तर सोंडेवर मध्यभागी वसलेला उंचच उंच गोलाकार उपळ्या बुरूज आणि त्याच्या पायºया हे या भूदुर्गाचे अजून एक आगळे वैशिष्ट्य. उपळ्या बुरजावर दोन तोफा ठेवण्यासाठीच्या रचना आणि भल्या मोठ्या तोफा आजही आहेत. तेथूनच एका बाजूने एक छोटा जीना बुरजाच्या पोटात घेऊन जातो. तो पाणवठ्यावरून येणारा पश्चिमेचा सुसाट वारा झेलणाºया सुंदर सज्जापाशी. अशा बुरजाची आजूबाजूच्या प्रदेशावर टेहळणी करण्यासाठीची उपयुक्तता दाद देण्याजोगी!

नळदुर्ग गावाची उत्तर-दक्षिण विभागणी करणारा रस्ता किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी घेऊन जातो. सुरेख झरोखे असलेल्या दोन भरभक्कम बुरजांच्या मागे लपविलेल्या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश होतो. दुहेरी तटबंदीतून जाणा-या या वळणा-वळणांच्या मार्गाला दोहो बाजूंच्या अवाढव्य बुरजांमुळे अजून भक्कम सुरक्षितता मिळाली आहे. या मार्गाने पश्चिमाभिमुखी गोलंबार दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. या दरवाजाच्या दोन्ही बाजूंना सैनिकांसाठी देवड्या आहेत तर लगतच एक छोटी मशीद ही आहे. आज किल्ल्यात हत्तीखाना, आदिलशाही वैशिष्ट्यांची नानिमाँ मशीद आणि दर्गा, मुन्सीफ कोर्ट, पूर्व तटबंदीलगत असलेला रंग महाल, बारादरी या इमारती ब-यापैकी अवस्थेत उभ्या आहेत. बारादरी या पाणवठ्याच्या काठावर असलेल्या इमारतीची बांधणी हैदराबाद निजामाच्या काळात स्वत: निजाम व त्याच्या कुटुंबियांना राहण्यासाठी केली गेली असल्याचे एकोणिसाव्या शतकातील थोर पुरातत्ववेत्ता कर्नल मिडोस टेलर नमूद करतो. पुढे तो स्वत:सुद्धा या किल्ल्याचा कारभार सांभाळत असताना या इमारतीत राहिला होता. बारादारीच्या शेजारी दरबार भरवण्यासाठी योग्य अशी ही जागा आहे.

याशिवाय मात्र इतर अनेक इमारतींचे केवळ भग्नावशेषच दिसतात. बारादरीसमोरच एकेकाळी ऐसपैस राहण्याजोगी; पण आज अतिशय पडझड झालेल्या इमारतीचे भग्नावशेष दिसतात तर रंग महालाच्या दोन्ही बाजूस काही इमारतींचे भग्नावशेष, एकटीशी घुमटी आणि काही युरोपिअन कबरींचे अवशेष आहेत. त्याविषयी आपल्याला फारशी माहिती अजून तरी मिळालेली नाही. उपळ्या बुरजाच्या शेजारील इमारतीचे अवशेषही मोठ्या प्रांगणाचा भाग असावेत. किल्ल्यात मशिदीच्या बाजूला काही कुटुंबांनी आपले बस्तान मांडले आहे तो भाग वगळता बाकी किल्ला जिज्ञासूंना पाहता येतो. असा हा अवाढव्य किल्ला मध्ययुगीन काळातील अत्युत्कृष्ट जल-अभियांत्रिकीच्या रचनेसाठीही नावाजला गेलेला आहे. ही संरचना आणि इतर अवशेष याविषयीचा इतिहास पुढील भागात पाहूया...
 

(लेखिका पुरातत्वज्ञ आणि वास्तुसंवर्धनतज्ञ आहेत.)
 

Web Title: Architecture inventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.