Ramzan : रमजानमध्ये महिलांची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 07:00 AM2018-05-26T07:00:00+5:302018-05-26T07:00:00+5:30

पवित्र रमजान महिन्यात महिलाही रोजे ठेवतात. धार्मिक रिवाज पाळतात. त्याचवेळी इफ्तारी, सहरीसाठी कुटुंबीयांसाठी रुचकर पदार्थही त्याच रांधतात. त्याविषयीची माहिती:

The role of women in Ramzan | Ramzan : रमजानमध्ये महिलांची भूमिका 

Ramzan : रमजानमध्ये महिलांची भूमिका 

Next

नौशाद उस्मान

संस्कृतीचं रक्षण आपल्या देशात खऱ्या अर्थानं कुणी करत असतील तर त्या महिलाच.  सण, उत्सवात महिलांची फार मोठी भूमिका असते, तशीच रमजानमध्येही महिलांची फार महतवाची भूमिका आहे. याला ऐतिहासिक पार्श्वभूमीही आहे. याच रमजानच्या एके रात्री प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यावर अल्लाहकडून (ईश्वराकडून) कुराणाचा पहिला श्लोक ''इकरा (वाचा/शिका)'' पहिल्यांदाच अवतरित झाला. त्याबरोबरच त्यांना प्रेषित्व प्राप्त झाल्याची घोषणाही याच महिन्यात झाली. त्यानंतर प्रेषितांनी ईश्वरी संदेशाच्या प्रचाराचा प्रारंभ केला तो त्यांच्या पत्नी आदरणीय खतिजा यांना इस्लामची दीक्षा देऊन. अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्याकडून इस्लामची दीक्षा घेणारी सर्वात पहिली व्यक्ती एक स्त्रीच होती आणि ती ऐतिहासिक घटना रमजानमध्येच घडली. आदरणीय खतिजापासून तर आज जगाच्या जवळपास दोनशे कोटी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचलाय आणि तो त्यांनी स्वीकारला. पण या लोकशिक्षणाची सुरुवात एका स्त्रीपासून प्रेषितांनी सुरु केली होती हे विशेष.

आजही रमजान महिन्याच्या दैनंदिन सोपस्कारात महिला फार महत्वाची भूमिका निभावतात. ती स्वतः आणि घरचे लोकं रोजा ठेवतात म्हणून त्यांच्या सहेरीकरिता ती रात्रीच तयारी करून ठेवते. कणिक भीजवून फ्रीजमध्ये ठेवते, तर कधी मटन उकळून फ्रीजमध्ये ठेऊन देते. मूग किंवा वाटाणे वगैरेची एखादी डिश सहेरीला करायची असेल तर रात्रीच ते भिजवून ठेवते. 

आजकाल औरंगाबादमध्ये सहेरीची अंतिम वेळ जवळपास साडे चार वाजता आहे. अशावेळी महिलांना तीन साडे तीन वाजताच उठावे लागते. तब्बल पावणेचार वाजेपर्यंत स्वयंपाक आटपून घरच्या मंडळींना झोपेतून उठवतात आणि जेवण वाढतात. स्वतःदेखिल त्यांच्यासोबत सहेरी करून रोजा ठेवतात. ती थकली असेल तर काही पुरुषदेखील स्वतः स्वयंपाक करून तिला जेवू घालतात. प्रेषित स्वतः देखिल काहीवेळा स्वयंपाक करून त्यांच्या पत्नींना जेवू घालायचे. ही प्रेषित परंपरा आहे.
सहेरी करून सगळे नमाज पढतात, महिलादेखील नमाज पढतात. महिलांनादेखील मशिदीत प्रवेश करण्याची परवानगी आहे, पण घरी नमाज पढण्याची सवलत दिलेली आहे. नाहीतर भल्या पहाटे उठून स्वयंपाक केल्यावर नमाजसाठी दूर एखाद्या मशिदीत जाणे त्यांना अवघड गेले असते. या सवलतीचा आपल्या देशात महिला पुरेपूर लाभ घेत सहसा घरीच नमाज पढतात. मुंबई, दिल्ली व इतर काही ठिकाणी मात्र काही महिला मशिदीत जाऊन नमाज पढतात.

नमाजनंतर काही महिला कुराणाचे पठण करतात तर काही महिला थकल्यामुळे आराम करतात. बऱ्याच शहरात आजकाल ''समाअत ए कुरआन'' म्हणून खास फक्त महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत. त्यात एखादी आलेमा (पुरुष मौलवी किंवा आलिम असतो तशी महिला देखील आलेमा असते) कुरआनचे अरबीत पठन करते, त्याचे उर्दूत भाषान्तर वाचते आणि नंतर त्याचे निरूपण स्थानिक भाषेत समजाऊन सांगते. दोन ते तीन तासांचा तर कुठे कुठे चार तासांचा  हा कार्यक्रम असतो. कुरआनच्या तीस खंडांपैकी दररोज एका खंडाचे पठन केले जाते. औरंगाबादमध्ये सध्या जमाअत ए इस्लामी हिंद या एकाच संघटनेच्या महिला आघाडीतर्फे शहरात विविध ठिकाणी असे जवळपास चाळीस ''समाअत ए कुरआन''चे वर्ग चालतात. इतर संघटनांची संख्या वेगळी. ही एकप्रकारे महिलांमध्ये प्रबोधनाची लोकशिक्षणाची चळवळच आहे.
त्यांनतर अनेक महिला आराम करतात. दुपारची आणि सूर्यास्तापूर्वीची नमाज पढली जाते. पुरुषही ही नमाज पढतात. लहान लेकरांसाठी कधी कधी थोडेसे काही तयार करावे लागते. पण सहसा महिनाभर दुपारी एकप्रकारची महिलांना सुट्टीच असते. मात्र संध्याकाळी पाच नंतर पुन्हा त्यांची लगबग सुरु होते. कारण सूर्यास्तानंतर इफ्तार करावयाचा असतो. खरं म्हणजे इफ्तार हा साध्या पद्धतीने देखील केला जातो. पण दिवसभर खाणे पिणे बंद असल्यामुळे काहीतरी खास खावं म्हणून थोडेफार फराळाचं तयार करून घेतात. सूर्यास्तानंतर घरच्या सर्वांसोबत इफ्तार केला जातो. इफ्तार नंतर नमाज पढतात. मग रात्रीचे जेवण उरककल्यानंतर रात्रीची ''तराविह'' ही खास दीर्घ नमाज पढली जाते. काही ठिकाणी महिलांची स्वतंत्र तराविहची नमाज होते, त्याचे नेतृत्व महिला-मौलवीच (आलेमाच) करते. रात्री त्या आराम करतात.  अशाप्रकारे महिलांचा रमजानची दैनंदिनी संपते. यात पुरुष मंडळीही त्यांना नक्कीच हातभार लावतात, पण किचनक्वीन असतात त्या फक्त महिलाच!

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: The role of women in Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.