Ramzan : रोजा आणि मानवी जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 07:01 AM2018-06-13T07:01:01+5:302018-06-13T07:01:01+5:30

मानवी जीवनावर पडणारा रमजानमधील रोजाचा परिणाम नेमका काय असतो, त्याचे विवेचन:

Ramzan: Roza and humanbeings | Ramzan : रोजा आणि मानवी जीव

Ramzan : रोजा आणि मानवी जीव

नौशाद उस्मान

रमजान महिन्यात प्रत्येक वयोगटाच्या व्यक्तीसाठी सुख समाधान व पुण्यप्राप्तीसाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. अनेक वयोवृद्ध लोकंही रोजे ठेवतात. अगदी कडक उन्हाचे दिवस असले तरीही, पंधरा सोळा तासांचा दिवस असला तरीही ते रोजे ठेवतात. पण काही लोकं, विशेष करून बुजुर्ग मंडळी बिमार असल्यामुळे त्यांना रोजे ठेवण्यास डॉक्टरांनीच मनाई केलेली असते. अशावेळी कुरआनात त्यांना रोजे ठेवण्याच्या नियमातून सवलत दिलेली आहे. अल्लाह कुरआनात सांगतो -

''असतील तर त्यांनी उपवास काळानंतर उपवास करावेत आणि ज्या लोकाना उपवास करण्याचे सामर्थ्य असेल (परंतु उपवास करणार नाहीत) त्यांनी दुर्बलांना मोबदला (फिदिया) म्हणून जेवू घालावे. एका उपवासासाठी एका दुर्बलाला जेवू घालावे आणि जो स्वेच्छापूर्वक अधिक भले करील तर ते त्याच्या स्वतःसाठीच भले आहे. परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.'' - कुरआन (२:१८४)

यावरून लक्षात येते कि, अल्लाहने मानवी जीवाला किती महत्व दिले आहे ते. मानवी जीव धोक्यात येत असेल तर अल्लाह स्वतःची उपासना करण्यात सूट देऊन टाकतो. हा मानवी जीवाचा सम्मान आहे. मुळात धर्माचा केंद्रबिंदूच माणूस आहे. जीव वाचविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जीवासाठीच अल्लाहने प्रेषित पाठविले, त्यांना ग्रंथ दिले, धार्मिक सोपस्कार सांगितले. धार्मिक सोपस्कार हे मानवी कल्याणासाठीच असतात. त्यामुळे अल्लाहचा काही फायदा किंवा तोटा होत नसतो, तर मानवानेच हित त्याद्वारे साधले जाते. रोजादेखील मानवी कल्याणासाठीच असतो. त्यामुळे शारीरिक आरोग्यासोबतच ईशपरायणता वृद्धिंगत होऊन अध्यात्मिक आरोग्यही लाभते. माणूस नैतिक बनतो, या नैतिकतेचा फायदा त्याच्या भोवताल असलेल्या लोकांनाही होतो.

परंतु शारीरिक आरोग्य व्यवस्थित नसेल आणि रोजामुळे ते आणखीनच बिघडत असेल तर मात्र रोजा ठेवण्यापासून सूट आहे विशेष! रोजा ठेवण्यास असमर्थ असेल तर अल्लाहने त्याचा प्रायश्चित म्हणून दुर्बल, अनाथ, गरीब, असहाय पददलितांना जेऊ घालण्याचा आदेश दिला आहे. इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रायश्चित म्हणून रंजल्या गांजल्या भुकेल्या गोरगरिबांना जेऊ घालण्याचा इथे आदेश देण्यात आला आहे.

रोजा सुरु असतांना भर दिवसा मध्येच तब्येत बिघडली तर रोजा तोडण्याचीही परवानगी आहे. तो रोजा ईदनंतर पुन्हा कधीही ठेऊन रोजांची संख्या पूर्ण करण्यात येऊ शकते. एवढेच नव्हे तर महिलांना ऋतुकाळात फार त्रास होतो. म्हणून त्यांना त्या दिवसात रोजे न ठेवता ईदनंतर सुटलेले रोजे पूर्ण करण्याचा आदेश आहे. या ऋतू काळात त्या अपवित्र वगैरे असल्याचा कुठेही ग्रंथात उल्लेख नसून ही एक सवलत आहे. कारण महिलांचा जीवदेखील तेवढाच महत्वाचा मानला गेला आहे, जेवढा पुरुषांच्या जीवाला महत्व दिले गेले, नव्हे तर महिलांना थोडं झुकतं मापच देण्यात आले आहे.
फक्त बिमारीतच नव्हे तर प्रवासात देखील रोजे ठेवण्याची सूट दिलेली आहे. कारण जुन्या काळात जेंव्हा वाहतुकीची साधनं आजच्याएवढी उपलब्ध नव्हती. तेंव्हा घोडे, उंट वगैरे जनावरांवर प्रवास केला जायचा. त्यामुळे प्रवास खूपच त्रासदायक ठरत होता. वाळवंटात तर अनेक जण प्रवासातच मृत्युमुखी पडायचे. त्या त्रासदायी परिस्थतीत आणखी त्रास नको म्हणून त्या काळात सुटलेले रोजे ईदनंतर कधीही ठेवण्याची मुभा आहे. परंतु काही इस्लामी विचारवंतांनुसार आजच्या परिस्थितीत त्या काळात होता तसा त्रासदायक प्रवास नसतो. तर उलट एसी बससेस, ट्रेन, विमान यांचीही सुविधा उपलब्ध आहे. म्हणून ही सवलत अशा आरामदायी प्रवासाला लागू नसल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण रमजान काळात सर्वांसोबत रोजे ठेवण्यात सोपे जाते. एरवी एकटे एकटे सकाळी उठून सहेर करणे, एकएकटे इफ्तार करणे अवघड जाते. कदाचित म्हणूनच उपरोक्त श्लोकात शेवटी म्हटले आहे '' परंतु जर तुम्ही जाणलेत तर तुमच्यासाठी हेच अधिक उचित आहे कि तुम्ही उपवास करावा.'' कारण सामूहिकरीत्या केलेल्या केलेले काम सोपे जाते, हा सामाजिकतेचा फायदा आहे. अशाप्रकारे मानवी जीवाचं महत्व म्हणून रोजे ठेवण्यात सवलत दिलेली आहे तर दुसरीकडे संतुलन साधत सामाजिकतेचा फायदा असल्याने थोडा त्रास सहन करून रोजे ठेवण्यास प्रोत्साहन देखील दिलेले आहे. मानवी जीव महत्ता आणि स्वनियंत्रणासाठी ईशोपासना हे संतुलन, हा सम्यक मार्गदेखील इस्लामचं एक वैशिष्ट्य आहे.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)
 

Web Title: Ramzan: Roza and humanbeings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.