Ramzan : रोजामुळे आरोग्याचे फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 07:15 AM2018-05-24T07:15:15+5:302018-05-24T07:15:15+5:30

रमजान महिन्यातील रोजा हे धार्मिक रितीरिवाजांचा भाग असले तरी त्यांचे आरोग्यदायी फायदेही खूप आहेत. त्यांची माहिती.

Ramzan: Health benefits due to Roza | Ramzan : रोजामुळे आरोग्याचे फायदे

Ramzan : रोजामुळे आरोग्याचे फायदे

नौशाद उस्मान

अनेक धार्मिक सोपस्कारांत अध्यात्मासह लौकिक फायदेदेखील असतात. आज आपण आरोग्याच्या दृष्टीने रोजाचे फायदे बघू या.  आरोग्याच्यादृष्टीने व्यायामासह आहाराचंही महत्त्व आहे. शरीराचे आरोग्य जसे आवश्यक आहे, तसेच माणसाचे नैतिक, अध्यात्मिक आरोग्यदेखील गरजेचे आहे. आपल्यावर अल्लाहची, परमेश्वराची सतत नजर असते म्हणून रोजा असताना रोजादार हा एकांतातही पीत नाही की खात नसतो, अशाप्रकारे रोजा नसतानाही आपल्यावर बाराही महिने ईशअस्तित्वाचे भान ठसले गेल्यामुळे अगदी एकांतातही पाप करायचं नाही, अन्यथा अल्लाह आपल्याला या लौकिक जीवनात किंवा मरणोत्तर जीवनात नक्कीच शिक्षा करतो, अशी ईशपरायणता (त़कवा) भक्ताच्या मनात उत्पन्न करणे, हाच रोजाचा मूळ उद्देश्य आहे. पण त्यासोबतच याचे आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचे खूप फायदे आहेत.

रशियन शास्त्रज्ञ यूरी निकोलाइएव व टेक्सास येथील डॉ. ऐलन कॉट यांच्यानुसार पूर्ण महिन्याचे रोजे पाळल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते, पोटात विषाक्त तत्त्वे असतील तर त्यांचा निचरा होतो, प्रतिकार शक्तीत वाढ होते, बौद्धिक शक्तीचाही विकास होतो. डॉक्टर सांगतात की, सर्वसामान्य दिवसांत आहारामुळे आमाशय निरंतर सक्रीय असते, परंतु रोजा ठेवला असताना त्याला आराम मिळतो. डॉक्टरांचं असंही म्हणणे आहे की, रोजामुळे अशक्तपणा येतो हा गैरसमज आहे. खरं म्हणजे पाणी कमी प्याल्यामुळे असं होत असलं तरीही रोजा सोडल्यानंतर भरपूर पाणी प्याले, तर सगळं काही सामान्य होऊन जातं.
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात सिद्ध झालं की, पूर्ण रमजान महिन्यात रोजे ठेवल्याने माणसाचा आहार पूर्णपणे संतुलित होऊन जातो. जॉर्डनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात निष्पन्न झालं की, रमजान महिन्यात दारू व धुम्रपानसारखी व्यसने सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे उपक्रम आता आशिया व आफ्रिकेत प्रामुख्याने राबवण्याचा प्रघात आहे.

सन १९९७ मध्ये याविषयी झालेल्या संशोधनात हे सिध्द झाले की रक्तातील वाढलेले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण उपवासामुळे किमान आठ टक्के तर ट्रिग्लीसिराईड ३० टक्के कमी झाल्यामुळे ह्रदय रोगाचे प्रमाण कमी होते. रमजान महिन्यात खजूर, बदाम, सूप आणि घरगुती अन्नासारखा पौष्टिक आहार घेतला जातो. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. तसेच रात्रीच्या एका विशेष दीर्घ नमाजामुळे शरीराला उत्तम व्यायाम मिळतो.

धीरेन गाला यांच्यानुसार डायटिंगपेक्षा रोजा हा लठ्ठपणा कमी करण्याकरिता जास्त उपयोगी ठरतो. डॉ. एडवर्ड पोरंगटीन हे त्यांच्या ‘फिलॉसफी ऑफ फास्टिंग' यात लिहितात की, ‘‘शारीरिक आरोग्य तर अनेक नैसर्गिक उपचारांनी प्राप्त होते, पण मानसिक शांती-समाधान प्राप्त करण्याकरिता रोजापेक्षा  जास्त उत्तम कोणताही उपचार नाही. तर मग ठेवताय ना यंदा रोजे?
 

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: Ramzan: Health benefits due to Roza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.