Ramzan : रमजानचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 07:00 AM2018-06-14T07:00:00+5:302018-06-14T07:00:00+5:30

रमजान या पवित्र महिन्यात इस्लाम धर्म नेमका काय संदेश देतो त्याची माहिती :

The message of Ramzan | Ramzan : रमजानचा संदेश

Ramzan : रमजानचा संदेश

नौशाद उस्मान

कुरआनचा संदेश हाच रमजानचा संदेश आहे. रमजानमध्ये अवतरित झालेल्या  कुरआनचे मुख्य तीन तत्व - एकत्व, अखेरत्व आणि प्रेषित्व. त्या आपण थोडक्यात समजून घेऊ -

१) एकत्व -
विश्वनिर्मितीमागे जे कोणते तत्त्व, जी कोणती शक्ती कारणीभूत ठरली, ज्या कोणत्या अस्तित्वामुळे या सृष्टीचे संचलन होते त्या अस्तित्वाला,  त्या शक्तीला किंवा त्या तत्त्वाला इस्लाममध्ये ‘इलाह’ म्हणजे ‘पूज्य’ म्हटले गेले आहे. त्याला ‘अल’ हे प्रत्यय लागून तो शब्द ‘अल-इलाह’ झाला आहे. ‘अल’ या प्रत्ययाचा उपयोग इंग्रजीतल्या ‘दि’ सारखा होतो. हे उपपद लावण्याच्या अनेक नियमांपैकी एक म्हणजे एकमेव असलेल्या अस्तित्वाच्या नावामागे हे प्रत्यय लागते. अल- इलाहचा अपभ्रंश होऊन पुढे हा शब्द ‘अल्लाह’ झाला आहे. अल्लाहची अनेक नावं आहेत. अरबीत त्याची ९९ नावं आली आहेत. त्यापैकी एक म्हणजे खालि़क (निर्माता). याच खालि़कला महात्मा फुलेंनी ‘निर्मिक’ असे संबोधले आहे.
इस्लामनुसार अल्लाह हा एकमेव निर्माता, पालनकर्ता, संहारकर्ता व पुनर्जिवित करणारा आहे. तोच सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता असून त्याच्या मर्जीशिवाय कुणीही नफा-नुकसान करू शकत नाही. जीवन-मृत्यु देणारे तेच एकमेव अस्तित्व आहे. उपासना आणि आज्ञापालन त्याचेच केले जावे. त्याच्याशिवाय कुणीही, अगदी प्रेषित पण पुज्यनीय असू शकत नाही. कारण पुज्यनीय फक्त आणि फक्त अल्लाहच आहे. इस्लामचा मूलमंत्र आहे ‘‘ला इलाह इल्लल्लाह, मुहम्मदर्रसूलूल्लाह’’ म्हणजे ‘‘अल्लाहशिवाय कुणीही पुजा करण्यास योग्य नाही, मुहम्मद (सलम) अल्लाहचे प्रेषित आहेत.’’ रोजा वारंवार रोजाधारकाला आठवण करून देतो कि, कुणी पाहत नाही म्हणून लपून पाणी पिऊ नको, कारण तो अल्लाह तुला पाहतोय. नाहीतर तो तुला मरणोत्तर अखेरच्या जीवनात शिक्षा करेल. आता हे अखेरचे जीवन काय असते ते आपण पाहू या.

२) अखेरत्व -
 एक ना एक दिवस सर्वांना मरण अटळ आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होणारच असल्याचं विज्ञानदेखील मानते. मेल्यानंतर एक दिवस तो पुन्हा जिवंत होणार. माणूस मेल्यानंतर कयामतच्या दिवशी पुन्हा कसा काय परत जीवंत होणार याविषयी अल्लाह (ईश्वर) सांगतो-
‘‘मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेंव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो काहीच नव्हता?’’
                        - कुरआन (१९:६६)

म्हणजे मी आज एकोणचाळीस वर्षांचा आहे, तर चाळीस वर्षांपूर्वी मी कुठं होतो? कुठंच नाही? आईच्या गर्भात येण्यापूर्वी माणुस कुठं असतो? आई- वडिलांच्या शरिरातील दोन भिन्न तत्त्वांच्या मिश्रणातून माणूस जन्म घेतो, ते तत्त्व कुठून येते? ते जे अन्न खातात त्यातून. ते अन्न कुठून येते? जमिनीतून, पाण्यातून. म्हणजे जमीनीतली माती, पाणी, हवा, प्रकाश व इतर तत्त्वे मिळून एक माणुस उत्पन्न होतो. त्यापूर्वी तो कुठेच नसतो. तो मोठा होतो. मरतो. मरून त्याची माती होते किंवा राख होते. हाडं उरतात. तो जेंव्हा काहीही नसताना अल्लाह (ईश्वर) त्याला उत्पन्न करू शकतो, तेंव्हा त्याचे काहीतरी अवशेष शिल्लक असताना अल्लाह त्याला का नाही पुन्हा जिवंत करू शकत? त्याला हे शक्य आहे. ताजमहाल उभारणाऱ्या अभियंत्याला तो उध्वस्त करून पुन्हा उभारता येतो. तसं मानवी शरीर उभारणाऱ्या त्या महान निर्मिकाला हे शरीर उद्ध्वस्त झाल्यानंतर पुन्हा उभारणे का म्हणून शक्य होणार नाही! वरील श्लोकात अल्लाह हेच सांगतोय. एक खून करणाऱ्याला आणि शंभर खून करणाऱ्यालाही या जगात फक्त एकदाच फाशी दिली जाऊ शकते. तेंव्हा इतर ९९ खुनांची शिक्षा वेंâव्हा मिळणार? मग ईश्वर जर न्यायी आहे, तर मग तो न्याय केंव्हा करणार? यासाठी नक्कीच तो एक दिवस सर्वांना जमा करून जाब विचारणारच आहे, यावर इमान राखल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वराशी इमान राखून परलोक नाकारणे, जाब देण्याचा दिवस नाकारणे म्हणजे त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उत्पन्न करून त्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न करणे होय. अशा ईशद्रोही लोकांना तो नरकात टाकणार. म्हणून मेल्यानंतर जिवंत होऊ, या सिद्धांताशी इमान राखणे गरजेचं आहे. रोजा याचकडे लक्ष वेधतो कि, रोजाचे नियमभंग केले तर मरणोत्तर जीवनात अल्लाहशी गाठ आहे.

३) प्रेषित्व -
एकत्व आणि अखेरत्त्वाची शिकवण देण्यासाठीच अल्लाहने लोकांमधूनच काही लोकं निवडले आणि त्यांना फरीश्त्यांमार्फत (ईशदूतांमार्फत) संदेश दिले, तेच संदेश त्या लोकांनी लोकांना सांगितले. अशा संदेशवाहकांना ''प्रेषित'' म्हणतात. असे जगभरातील देश प्रदेशात जवळपास १ लाख २४ हजार प्रेषित आल्याचा इतिहासात उल्लेख सापडतो. काहींची नावे सांगण्यात आली आहे, तर काहींची नावे नाही. पण त्यांची शिकवण एकच होती. इस्लामचे सर्वात पहिले प्रेषित म्हणजे भूतलावरील पहिले माणूस प्रेषित आदम आणि सर्वात शेवटचे प्रेषित म्हणजे प्रेषित मुहम्मद सल्लम आहेत. हे सर्व प्रेषित महान होते, आदरणीय होते परंतु सगळे माणसांमधूनच अल्लाहने निवडले होते, ते देव नव्हते. ते अनुकरणीय आहेत पण पुज्यनीय नाहीत. कारण पुज्यनीय ठरविल्याने ते अनुकरणीय राहत नाहीत. प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्यापूर्वीच्या प्रेषितांची शिकवण आणि त्यांना अल्लाहकडून देण्यात आलेले ग्रंथ यांच्यात काही लोकांनी परिवर्तन करून टाकले आहे. पण प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी अल्लाहकडून ग्रंथ आल्यावर त्याला ताबडतोब लिपिबद्ध करण्यासाठी लोकांना सांगून त्याची प्रत करविली असल्याने आणि त्यानंतर त्यांचे सहकारी उस्मान गनी यांनी एक आयोग नेमून त्याच अधिकृत प्रतीच्या शंभर प्रति बनवून जगभरात पाठवून दिल्याने कुरआनाची शिकवण तशीच्या तशीच सुरक्षित राहिली आहे.

प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या तोंडून निघालेले कुरआन हे अल्लाहचे वचन असल्याचा पुरावा म्हणजे प्रेषित हे उम्मी (शून्य) असूनही त्यांच्या तोंडून निघालेल्या ग्रंथात अशा वैज्ञानिक आणि ऐतिहासिक तथ्यांचा समावेश आहे कि, ज्यांचा शोध त्या काळात लागलेला नव्हता. कोणताही गुरु नसलेल्या, कोणतेही पुस्तक न वाचलेल्या, कोणताही प्रयोग न केलेल्या एक 'उम्मी' व्यक्तीकडून हे रचले जाणे अशक्य आहे. म्हणून हा ग्रंथ नक्कीच सृष्टीरचेत्याकडून असल्याचे सिद्ध होते.

पूर्वीचे प्रेषित हे एका विशिष्ठ देशासाठी, विशिष्ठ काळासाठी होते, अंतिम प्रेषित हे समस्त मानवतेकरिता आणि सर्व युगांसाठी आलेले होते. पूर्व प्रेषितांच्या आदर करत आचरण मात्र अंतिम प्रेषितांवर करणे क्रमप्राप्त आहे. प्रेषितांना नाकारणारा त्यांना पाठविणाऱ्या अल्लाहला नाकारतो, असा अर्थ घेतला जातो. या सर्व प्रकाराला प्रेषित्व म्हणतात.
प्रेषितांची शिकवण आणि उपरोक्त तिन्ही तत्व आत्मसात केल्याशिवाय रोज, रमजान ईदला काहीएक अर्थ उरत नाही. हा संदेश आत्मसात करून जीवन व्यक्त केल्यास प्रत्येक दिवस हा ईदचा दिवस सिद्ध होऊ शकतो.

(लेखक नौशाद उस्मान हे इस्लामचे अभ्यासक आहेत)

Web Title: The message of Ramzan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.