शिक्षक मतदारसंघाची निवडणूक : आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
भंडारा : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे निर्देश मिळताच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी वाहन जमा केले आहे.
ग्रामीण विकासाची नाळ जुळलेल्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना ग्रामीण भागात शासकीय दौरे तथा कार्यक्रमासाठी फिरता यावे यासाठी शासनाने त्यांना वाहन दिले. त्या वाहनातून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विशेष समितीचे सभापती हे दौरे करतात. काही दिवसापुर्वी भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. यावेळी आचारसंहिता असल्याने पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा झाले होते. त्यानंतर आता शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत असल्यामुळे आचारसंहिता लागली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांचे वाहन जमा करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समितीचे चार सभापती यांच्या वाहनाबाबत दिलेले निर्देश पुढील आदेशापर्यंत लागु राहणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी शनिवारला आदेश निर्गमित केले आहे. त्याअनुषंगाने पदाधिकारी व त्यांच्या वाहनचालकांना आचारसंहितेचे उल्लंघन करु नये, अशा आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे पुढील तारखेपर्यंत या पदाधिकाऱ्यांना शासकीय वाहनांचा दौऱ्यासाठी वापर करता येणार नाही. त्यामुळे हे पदाधिकारी शासकीय वाहनांऐवजी खासगी वाहनाने भंडारा शहराबाहेरील दौरे करतील. (शहर प्रतिनिधी)

आदेशात काय म्हटले आहे?
विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक असल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहनांचा वापर जिल्हा परिषद कार्यालयापासून भंडारा शहरातील निवासस्थानापर्यंत करता येईल. वाहनांचा असा वापर केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे असे निर्देशात नमूद आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही उपमुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी वाहनचालकांना बजावले आहे.