स्वीकृत सदस्यपदांची तडजोड सुरुच : गटनेता म्हणून अनिता पोगळे यांची एकमताने निवड
संजय साठवणे साकोली
राजकीयदृष्ट्या महत्वाची तथा खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या गावची नगरपरिषद म्हणून नावारुपास आलेल्या साकोली नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार ही उत्सुकता कायम असली तरी तीन नावाची चर्चा सध्या जोरात सुरु असून गटनेता म्हणून अनिता पोगळे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले आहे.
साकोली नगरपरिषदेच्या पहिल्या अध्यक्षपदाचा मान भाजपाच्या धनवंता राऊत यांना मिळाला. या १७ सदस्यीय नगरपरिषदेत अकरा नगरसेवक भाजपचे, चार अपक्ष व एक काँग्रेस व एक राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक निवडून आले. ही नगरपरिषद साकोली व सेंदुरवाफा या दोन्ही गाव मिळून झाल्यामुळे दोन्ही गावांना तेवढेच महत्व आहे. मात्र अध्यक्ष धनवंत राऊत या सेंदुरवाफा या गावच्या असल्यामुळे उपाध्यक्षपदाचा मान हा साकोली या गावाला मिळाला अशी नागरिकांची ईच्छा असली. साकोली या गावाहून पुरुषापैकी जगन उईके व तरुण मल्लानी ही दोन नावे चर्चेत आहेत. तर पुर्वी भाजपला असलेला मान ऐनवेळी पक्षाणी उमेदवारी नाकारल्यामुळे अपक्ष उमेदवारी लढवुन निवडून येणारे पुन्हा भाजपात आलेले रवि परशुरामकर. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत संध्या जगन उईके, तरुण मल्लानी व रवि परशुरामकर या तिघांची नावे चर्चेत असून यापैकी रवि परशुरामकर किंवा जगन उईके या दोघापैकी एकाची उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. अशी भाजपच्या गोट्यात चर्चा आहे. मकरसंक्रातीपुर्वी अध्यक्ष व नगरसेवक व अधिकारी या आपल्या पदभार सांभाळणार आहेत व त्यानंतर काही दिवसातच उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.

स्वीकृत सदस्याचा वाद कायम
साकोली नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यापदी कोणाची वर्णी लागणार याच्यावर सध्यातरी शिक्कामार्तब झाला असले तरी अ‍ॅड. दिलीप कातोरे, सेंदुरवाफा येथील माजी उपसरपंच आनिक निबेकर, संताजी तेली समाजाचे अध्यक्ष अ‍ॅड. बापुसाहेब अवचरे, भाजपचे महामंत्री बंडु बोरकर, नितीन खेडीकर, ललीत खराबे, चंद्रकांत वडीचार यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र यापैकी दोन भाग्यवंत कोण? हे लवकरच स्पष्ट होणार आहेत.
गटनेतापदी पोगडे
साकोली नगरपरिषदेच्या गटनेतापदी माजी उपसरपंच किशोर पोगळे यांच्या पत्नी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन पोगळे या पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक ४ मधुन निवडून आल्या आहेत.