तुमसर शहरात पाणीपुरवठा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:40 AM2019-05-05T00:40:37+5:302019-05-05T00:41:05+5:30

एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे.

Water supply in your city | तुमसर शहरात पाणीपुरवठा ठप्प

तुमसर शहरात पाणीपुरवठा ठप्प

Next
ठळक मुद्देटँकरने पाणीपुरवठा। वैनगंगा नदीपात्र कोरडे पडल्याचा फटका, सहा दिवसांपासून महिलांची पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे. नागरिकांची तहान भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासन तथा काही नगरसेवक व नगराध्यक्षातर्फे शहरात टँकरने पाणीपुरवठा करणे सुरु आहे. बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कवलेवाडा बॅरेजपर्यंत पाणी आले आहे. कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची गरज आहे.
तुमसर शहरापासून वैनगंगा नदी अवघ्या पाच ते आठ किमी अंतरावर आहे. शहराची लोकसंख्या ४५ हजार इतकी आहे. कोष्टी पंपहाऊस व माडगी पंपहाऊस मधून वैनगंगा नदीपात्रातून पाण्याचा उपसा करुन तुमसरकरांना पाणीपूरवठा करण्यात येतो. सध्या वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. माडगी येथील नगरपरिषदेची पाणीपुरवठा करणारी मोठी यंत्रणा आहे. नदीपात्रात विहिरी आहेत. सदर विहिरीपर्यंत पाण्याचा प्रवाह आठ ते दहा दिवसापूर्वी बंद पडला होता.
इनटेकवेलद्वारे पाणी नदीपात्रत पाण्याचा प्रवाह वळविण्यात आला. काही दिवस सुरळीत पाणी विहिरीपर्यंत आले, परंतू नदीचा प्रवाह अत्यंत संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीपर्यंत पाण्याचा प्रवाह येणे बंद पडले. त्यामुळे तुमसरची पाणीपूरवठा ठप्प पडली. सहा दिवसापासून पाणीपूरवठा ठप्प आहे. कोष्टी पंपहाऊसची तीच स्थिती आहे.
भांड्यांची रांग
तुमसर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता नगरपरिषद प्रशासन, काही नगरसेवक व नगराध्यक्ष यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे सुरु केले आहे. पाणीपुरवठा करताना मोठी कसरत करावी लागत असून उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी मोठी आहे. पाण्याकरिता टँकर आल्यावर नागरिक मोठी गर्दी करीत आहेत. पाण्यासाठी भांड्यांची रांग टँकरसमोर येथे दिसत आहे.

कवलेवाडा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग करण्याकरिता कवलेवाडा येथे भेट देवून संबंधितांना सांगण्यात आले. उद्यापर्यंत शहराला पाणीपुरवठा सुरु होईल. वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. टँकरने पाणीपुरवठा सुरु असून नागरिकांनी सहकार्य करावे.
- प्रदीप पडोळे,
नगराध्यक्ष, तुमसर

Web Title: Water supply in your city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.