उमेदवारीचा सस्पेन्स कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 09:59 PM2019-03-23T21:59:17+5:302019-03-23T22:00:09+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. युती आणि आघाडीने अद्यापही आपला उमेदवार घोषित केला नाही. कार्यकर्ते सैरभैर झाले असून ऐनवेळी कुणाला तिकीट मिळणार, यावर घमासान चर्चा मतदार संघात होत आहे.

Suspension of candidature | उमेदवारीचा सस्पेन्स कायम

उमेदवारीचा सस्पेन्स कायम

Next
ठळक मुद्देकार्यकर्ते सैरभैर : युती आणि आघाडीचा उमेदवारच अद्यापही ठरला नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. युती आणि आघाडीने अद्यापही आपला उमेदवार घोषित केला नाही. कार्यकर्ते सैरभैर झाले असून ऐनवेळी कुणाला तिकीट मिळणार, यावर घमासान चर्चा मतदार संघात होत आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीची अधिसुचना १८ मार्चपासून जारी झाली. नामांकन दाखल करण्यालाही प्रारंभ झाला. आतापर्यंत ९६ उमेदवारांनी २१५ अर्जांची उचल केली. सहा उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले. मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे ते भाजपा-शिवसेना युतीच्या आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या उमेदवाराकडे. या दोनही पक्षांनी अद्यापर्यंत आपले पत्ते उघड केले नाही. आता नामांकन दाखल करण्याला शनिवार आणि रविवार हे सुटीचे दिवस आल्याने सोमवार अखेरचा दिवस आहे. त्याच दिवशी नामांकन दाखल केले जाईल. मात्र उमेदवारी कुणाला मिळणार यावर गत महिनाभरापासून घमासान चर्चा होत आहे. प्रत्येकजण वेगवेगळी नावे सांगत आहे. सोशल मिडियावरही यावरूनच चर्चा होत आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना यासह विविध पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. दररोज कोणता ना कोणता पक्ष यादी घोषित करीत आहे. प्रत्येकजण भंडारा-गोंदियासाठी कोणाचे नाव घोषित झाले याची उत्स्तुकतेने यादी पाहत आहेत. परंतु शनिवारी सायंकाळपर्यंत भाजपा आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणाच केली नव्हती. उमेदवारी जाहीर करण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे पहिले आप पहिले आप असेच धोरण सुरू आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्यात पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे.
एकीकडे उमेदवाराच्या नावाची घोषणा नाही मात्र भाजपा आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कामाला लागल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे नेते मंडळी विविधी बैठका घेवून खल करीत आहे. भाजपची तिकीट शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत घोषित होईल, असे सांगितले जात आहे.
विविध नावांची चर्चा असली तरी प्रत्यक्षात जोपर्यंत पक्ष अधिकृत नावाची घोषणा करीत नाही तोपर्यंत कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. ऐनवेळी उमेदवारी बदलल्याचे उदाहरणे आहे. अशीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसचीही आहे. राष्ट्रवादी पक्षाची तिकीट कुणाला देतात यावरही विविध चर्चा होत आहे. शनिवारी भंडारा येथील बैठकीत उमेदवार कोण राहणार हे नक्की कळेल. परंतु सोमवारला सकाळी १० वाजता एकत्र येवून आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करायला निघू, असा संदेश देण्यात आला. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा उमेदवारी घोषित केव्हा होते आणि तिकीट कुणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी होणार नामांकनासाठी गर्दी
लोकसभा निवडणुकीच्या नामांकनासाठी आता सोमवार हा एकच दिवस उरला आहे. आतापर्यंत केवळ सहा जणांनी नामांकन दाखल केले. प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी अद्यापही नामांकन दाखल केले नाही. त्यामुळे सोमवारी नामांकन दाखल करण्यासाठी जिल्हा कचेरीत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ९६ उमेदवारांनी २१५ अर्जाची उचल केली. त्यापैकी किती जण आता नामांकन दाखल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार नामांकन दाखल करताना शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता असल्याने त्यामुळेही गर्दी वाढणार आहे.
भावी उमेदवारांनी थाटले मंडप
लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी आणि युतीतर्फे अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. मात्र ज्यांना पक्षाने आधीपासून हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यांनी सर्व तयारी पूर्ण केली असून भंडारा आणि गोंदिया येथे मंडप सुध्दा थाटले आहे.
युतीचा उमेदवार ठरविण्यासाठी अंतिम बैठक
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून युतीचा उमेदवार कोण असावा यासाठी शनिवारी (दि.२३) रात्री नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, संघाचे नेते, दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख आणि पक्षसंघटक उपस्थित राहणार असून त्यात उमेदवाराच्या नावावर अंतीम शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती आहे. युतीचा उमेदवार कोण ठरणार याकडे संपूर्ण भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणेनंतरच नावावरील पडदा उठेल.

Web Title: Suspension of candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.