भंडाऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आंदोलनात तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
भंडारा/शहापूर/जवाहरनगर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समितीने विदर्भात रास्ता रोको आंदोलन पुकारले होते. त्याअनुषंगाने शहापूर येथे माजी सभापती राजकुमार राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन तर भंडाऱ्यात माजी आमदार अ‍ॅड. आनंदराव वंजारी यांच्या शिष्टमंडळाने प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे सादर केले.
२८ सप्टेंबर १९५३ मध्ये नागपूर करारात वैदर्भीय जनतेची संमती न घेता विदर्भाला महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासुन वैदर्भीय जनतेवर अन्यायाची मालिका सुरू झाली ती अद्याप कायमच आहे. या करारानुसार विदर्भातील बेरोजगार तरूणांना २३ टक्के नोकऱ्यांपैकी केवळ ८ टक्के नोकऱ्या दिल्या. पुणे विभागाला १५ टक्के नोकऱ्या देऊन विदर्भातील ४ लाख नोकऱ्या पळविण्यात आल्या.
एमपीएससीच्या २३ टक्के नोकऱ्यापैकी २.२६ टक्के नोकऱ्या दिल्या. परिणामी विदर्भात उच्चपदस्थ अधिकारी पुणे, मुंबई, नाशिक शहरातील दिसुन येतात. विदर्भ स्वतंत्र राज्य झाले तर विदर्भातील तरूणांनाच नोकऱ्या मिळेल, एमपीएससीच्या जागी व्हीपीएससी होऊन याही नोकऱ्या वैदर्भीय तरूणांना मिळतील. विदर्भाचा वाटा विदर्भासाठी खर्च होईल. त्यामुळे गोसीखुर्दसारखे धरणासह अन्य धरणाची प्रलंबित कामे पूर्ण होतील. ८० टक्के शेतीचे सिंचन वाढेल, विदर्भाचा विकास होईल.
विदर्भातील विजेचे उत्पादन खर्च २.४० रूपये प्रति युनिट आहे. विजेचे दर निम्म्यावर येईल. कृषी पंपाचे लोडशेडींग संपेल. विदर्भाला २४ तास पूर्ण दाबाची वीज मिळेल. वैदर्भीय बेरोजगाराचा अनुशेष पुर्ण होईल, यासर्व मागण्यांसाठी विदर्भात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर विदर्भ राज्यआंदोलन समितीच्यावतीने माजी सभापती राजकपुर राऊत यांच्या नेतृत्वात दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रविण भोंदे, विलास मोथरकर, संदेश श्यामकुंवर, माजी पं.स. सदस्य आनंद तिरपुडे, मोरेश्वर गजभिये, अनमोल गजभिये, मोहन मथुरे, नत्थु शेंदरे, सुरेश गायधने, रूपेश सोनवाने, रमेश ठवकर, प्रणय घुले, नेमा खराबे, अशोक हर्षे, मुंशिलाल बंसोड, तुरज दुरूगकर, संजय कळंबे, घनश्याम बुधे, राधेश्याम डोंगरे, जगदीश डोंगरे, निखिल भुरे, संतोष कझळकर, आकाश वर्धे, अविलाश गेडाम सहभागी झाले होते.
राष्ट्रीय महामार्गावर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र नागरे, उपनिरीक्षक विलास पाटील, उपनिरीक्षक प्रिती आडे, उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी बंदोबस्त तैनात केला होता. (प्रतिनिधी/वार्ताहर)