कोका अभयारण्य : मानव व वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी संरक्षण दलाची भूमिका महत्त्वाची
आमगाव (दिघोरी) : राष्ट्रीय व्याघ्र संर्वधन प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया अंतर्गत तीन विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली आहे. कोका अभयारण्यामध्ये वाघांच्या संरक्षण व संवर्धनाची जवाबदारी हे सुरक्षा कर्मचारी करणार आहेत.
वाघांची संख्या झपाट्याने कमी होत असून अवैध शिकारीमुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ते टिकवून ठेवण्यासाठी व या प्राण्यांची जोपासणा करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना करीत आहे. त्याच अनुसंगाने शासनाने आरक्षित केलेल्या व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष व्याघ्र संरक्षण दलाची स्थापना करण्यात आली असून याची जवाबदारी हे संरक्षण दल करणार आहेत. कोका अभयारण्यामध्ये या सुरक्षा दलामध्ये २१ महिला व १० पुरूष सुरक्षाकर्मी असून १ महिला परिक्षेत्राधिकारी आहे.
हे विशेष दल जंगलातील अवैध शिकारीला आळा घालणे, अवैध वृक्षतोड थांबविणे, जंगलातील चराईला आळा घालणे, जंगलातील अवैध उत्खन्न रोखने व जंगलातील अतिक्रमणावर आळा घालणार असून जंगलांची झालेली ऱ्हास रोखण्याचे काम करणार आहेत. तसेच मानव व वन्यजीव यांच्यातील होणारा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने जनतेमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहेत.
या अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव अस्तित्वात असून अभयारण्याला लागून असलेल्या गावकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान सहन करावा लागत आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे जीवहानी व जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मानव व वन्यप्राणी यामध्ये संघर्ष टाळण्यासाठी या संरक्षण दलाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (वार्ताहर)