भंडारा : काही खासगी बँकांच्या एटीएममध्ये आणि काही राष्ट्रीयीकृत बँकांच्या एटीएम सुविधेतून शंभरची नोट गायब झाली आहे. पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटाच उपलब्ध असल्याच्या सुचना लावण्यात आल्या आहेत. परिणामी शंभरच्या नोटांचा तुटवडा बाजारपेठत जाणवू लागला आहे. एकट्या भंडारा शहरात ४० पेक्षा जास्त एटीएम आहेत.
बाजारपेठेत खरेदीचे व्यवहार क्रेडिट आणि डेबिट कार्डवर काही प्रमाणात सुरू असल्याचेही बोलले जात असले तरी कॅशलेस व्यवहाराबात जनजागृती अजुनही दिसुन येत नाही. अजूनही रोख पैशानेच व्यवहार करावे लागत आहे. त्यामुळे एटीएमची सुविधा अनेकांना सोयीची झाली आहे. परंतु त्याच एटीएममधून फक्त दोन हजारांच्या नोटा निघत आहेत. काही एटीएममध्ये ५०० च्या नोटा असल्यातरी सुटे नोटांसाठी नागरिक एटीएम टू एटीएम भटकत आहेत.
काल रविवारचा दिवस असल्याने शहराच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. मात्र बहुतांश एटीएममध्ये फक्त ५०० व २००० च्या नोटा उपलब्ध होत्या. समोवार सकाळपर्यंत ही स्थिती अजुनच बिकट झाली.
ग्रामीण भागातही अशीच स्थिती आहे. बँका उघडणार असल्या तरी सकाळ काळात एटीएममध्ये शंभर रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पाचशे रुपये काढण्यासाठी अनेकांना अडचणीचे ठरले. त्याचबरोबर शंभर रुपयांच्या आतील खरेदी केल्यावर पाचशे आणि हजारच्या नोटा दिल्या तर व्यापारी सुटे पैसे मागत आहेत. त्यामुळे ग्राहकांची कुचंबणा होत आहे.
८ नोव्हेंबर रोजी रात्री ८च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर एटीएमसमोर रांगा नसल्या तरी बँका मधील रांगा ६० दिवसांनंतरही ओसरण्याची चिन्हे नाहीत. ६० दिवसांनंतर, आता व्यवहार सुरळीत होतील, या आशेने एटीएम शोधणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच माघारी परतावे लागत आहे. (प्रतिनिधी)