गोसेच्या पाण्याचा निमगावला वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:49 AM2018-09-28T00:49:20+5:302018-09-28T00:49:40+5:30

भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले नाही.

Sapphire water siege | गोसेच्या पाण्याचा निमगावला वेढा

गोसेच्या पाण्याचा निमगावला वेढा

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्वसनाकडे शासनाचे दुर्लक्ष : जलकुंभ व स्मशानशेड पाण्यात, दूषित पाण्याचा फटका

तत्वराज रामटेके।
लोकमत न्यूज नेटवर्क
पहेला : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाअंतर्गत असलेल्या भंडारा तालुक्यातील निमगाव या गावाला चारही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. त्यामुळे धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २००९ पासून शासनाकडे मागणी करूनही निमगावचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये शासनाप्रती संतापाची लाट उसळली आहे. एकंदरीत गोसेखुर्द प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला असताना मात्र निमगाव या गावाला शापच ठरत आहे.
दिवसेंदिवस गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत असल्याने निमगावला पाण्याने चारही बाजूने घेरले आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाण्याची पातळी आता २४३ मीटर एवढी झालेली असून जर पाण्याची पातळी अजून वाढविली तर, अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
९०० लोकसंख्या असलेल्या निमगाव येथील १७५ शेतकऱ्यांची २२७.१७ हेक्टर शेती प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आली. यामुळे शेतकरी भूमिहीन झाले. सध्या केवळ ५८ शेतकºयांकडे शेती आहे. शासनाच्या धोरणानुसार ७० टक्के क्षेत्र बुडीत क्षेत्रात येत असल्याने त्या गावाचे पुनर्वसन करण्यात येते. एकंदरीत निमगावची शेती ५३ टक्क्याच्या वर बाधीत आहे. कारण जी शेती उरलेली आहे, ती बाहेरगावच्या शेतकºयांची आहे. त्यामुळे निमगावची टक्केवारी कमी आलेली आहे.
गोसेखुर्दचा जलस्तर वाढल्याने निमगाव येथील स्मशानशेड पाण्याखाली आले आहे. जर गावात एखादी मय्यत झाली तर अंत्यविधी करण्याकरिता निमगावला जागा उरलेली नाही. शासनाने स्मशानभूमीसाठी नव्याने जागा देण्यात यावी. तसेच निमगाव पिण्याचे पाण्याची एकमेव नळयोजना असलेल्या पाण्याची विहिर संपूर्णपणे पाण्याखाली आल्याने धरणाचे दूषित पाणी त्या विहिरीत जात आहे. ते दूषित पाणी निमगाव येथील नागरिकांना दररोज प्यावे लागते. त्यामुळे निमगाव येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.
निमगाव ते इटगाव हा रस्ता धरणाच्या पाण्याने पूर्णत: बंद झाला आहे आणि निमगाव येथील जी जमीन शिल्लक आहे ती याच मार्गाने आहे. या मार्गावर पाणी साचल्याने शेतकºयांना आपल्या शेतात जाता येत नाही. त्यामुळे शेती कशी करावी, या विवंचनेत शेतकरी पडले आहेत.
निमगाव येथील ५३ टक्के शेतजमीन बाधीत असल्याने या गावात रोजगार हमीची कामे उपलब्ध होत नाही. त्यामुळे भूमिहीन मजूरांना कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे, मुलांचे शिक्षण, त्यांचे विवाह व औषधोपचार कसे करावे तसेच शेती नसल्याने रोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळत नाही. विवाहयोग्य मुलांना मुली मिळत नाही. निमगाव येथील ग्रामपंचायतींनी २००९ मध्ये शासनाला प्रस्ताव पाठवून पुनर्वसनाची मागणी केली होती. तेव्हा तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी भंडारा तालुक्यातील निमगावचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यासाठी मंजुरी दिली. मात्र शासनाकडून मंजूरी न मिळाल्याने पुनर्वसन अद्यापही रखडलेले आहे.
लोकसभा पोटनिवडणुकीवर घातला होता बहिष्कार
पुनर्वसनासंदर्भात निर्णय होत नसल्याने चार महिन्यापूर्वी झालेल्या भंडारा- गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत निमगाववासीयांनी बहिष्कार टाकला होता. तरीही शासनाने याकडे लक्ष दिले नाही .पाण्यात गाव वाहून गेल्यावर शासन पुनर्वसन करणार काय? असा प्रश्न निमगाववासीयांनी उपस्थित केला आहे. यापुढे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत यावर तोडगा निघाला नाही तर, समोर येणाऱ्या संपूर्ण निवडणुकीवर सुद्धा बहिष्कार टाकू, असा निर्धार निमगाववासीयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Sapphire water siege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.