जिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:46 AM2018-08-21T00:46:26+5:302018-08-21T00:47:41+5:30

रुग्ण आणि नातेवाईकांच्या गर्दीने गजगजलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सोमवारी सकाळी आला. तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकासह संपूर्ण परिसर पिंजून काढला.

Rumored to be a bomb in the district hospital | जिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा

जिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा

googlenewsNext
ठळक मुद्देबॉम्बनाशक-शोधक पथक दाखल : अफवा पसरवणारा दीड तासात अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रुग्ण आणि नातेवाईकांच्या गर्दीने गजगजलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सोमवारी सकाळी आला. तात्काळ श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकासह संपूर्ण परिसर पिंजून काढला. बॉम्बची अफवा निघाली, परंतु तोपर्यंत सर्वांची पाचावर धारण बसली होती. अफवा पसरविणाऱ्या इसमालर अवघ्या दीड तासात जेरबंद करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना मुंबईच्या आरोग्य विभागातून सोमवारी सकाळी १०.३० वाजता दूरध्वनी आला. जिल्हा सामान्य रुग्णालयात बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून पोलीस अधीक्षकांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक कोरटी, ठाणेदार सुधाकर चव्हाण आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला माहिती दिली. ही बाब रुग्णां कळली तर मोठा गोंधळ होईल, अशी भीती होती. त्यामुळे त्यांना कोणताही सुगावा लागू न देता पोलीसांनी सर्च आॅपरेशन सुरू केले. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्ड, बाह्य रुग्णविभाग, पार्किंगचे ठिकाण आदी परिसर बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान व इतर उपकरणाच्या सहायाने पिंजून काढला. परंतु त्याठिकाणी बॉम्ब सदृश्य कोणतीही आढळून आली नाही. त्यानंतर शोध सुरू झाला, मुंबईच्या आरोग्य विभागात फोन करणाऱ्या इसमाचा.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पाच पथक, जिल्हा विशेष शाखेचे दोन पथक, नक्षलसेलच्या पथकाने शोध जारी केला. अवघ्या दीड तासात मिलिंद राजू मेश्राम रा. खात तालुका मौदा जिल्हा नागपूर याला अटक केली. त्यावेळी पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात बॉम्ब असल्याची अफवा परिसरात पसरली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. परंतु पोलिसांनी मोठ्या कौशल्याने परिस्थिती हाताळून कोणतीही अप्रिय घटना होवू दिली नाही.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आजीच्या उपचारासाठी खटाटोप
बॉम्ब असल्याची अफवा पसरविणारा मिलिंद मेश्राम याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आजीच्या उपचारासाठी त्याने मुंबईच्या आरोग्य विभागात दूरध्वनी करून बॉम्ब असल्याचे कळविले होते. मिलिंदची आजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयत दाखल आहे. परंतु तिच्यावर बरोबर उपचार होत नव्हते वैद्यकीय अधिकारी व नर्सेस लक्ष देत नसल्याने आपण हा फोन केल्याचे त्यांनी सांगितले. मिलिंदविरूद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Rumored to be a bomb in the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस