जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
भंडारा : शहरातील अंतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. अतिक्रमणाचा फटका बसलेल्या व्यावसायीकांचे पुनर्वसन करावे व त्यांना हक्काचे पट्टे द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे.
कुटुंबाचे पालन पोषन करण्याकरिता अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरु केले. त्याकरिता अनेकांनी राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या मोकळ्या जागेवर दुकान सुरु केले. तर अनेकांनी शहरातील अंतर्गत मार्गावर व्यवसाय थाटले. मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायीकांनी हा व्यवसाय करुन कुटुंबाचा गाढा सुरळीत चालविला आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग, नगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. यामुळे मागील अनेक वर्षांपासून सुरळीतपणे व्यवसाय करणाऱ्यावर अचानक झालेल्या या कारवाईमुळे आभाळ कोसळले.
फुटपाथवरील अतिक्रमण काढले. मात्र शहरातील अनेक धनदांडग्यांचे अतिक्रमण करुन केलेले बांधकाम काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून हा भेदभाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम बारापात्रे यांनी निवेदनातून केला आहे.
या अतिक्रमणधारक फुटपाथ व्यवसायीकांचे पुनर्वसन करावे व त्यांना हक्काचे पट्टे द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मनसेकडून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनविसेचे जिल्हाध्यक्ष शुभम बारापात्रे, अनुप हटवार, आयुष चौधरी, शशि माने, भागवत गिरोले, अभिजित नारनवरे, विक्रम सोनेकर, रोहीत झाडे, कार्तिक डेकाटे, अनिल मेश्राम, सचिन फेंडर, आकाश साठवणे, निखिल खांदाडे, रुपेश डोईफोडे, निकुंज निमजे, स्वप्नील हेडाऊ, साहिल सोनेकर, बिन्नी कटकवार, लक्ष्मण कटरे आदीनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)