जिल्हा प्रशासनाचा उपक्रम : पीओएस मशीनद्वारे डेमो, एलसीडीवर व्हिडिओद्वारे जागृती
भंडारा : नोव्हेंबर रोजी देशभरात झालेल्या नोटबंदीनंतर नागरिकांनी रोखरहित व्यवहाराकडे (कॅशलेश) वळण्यासाठी निती आयोगाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. कॅशलेश महाराष्ट्र या संकल्पनेनुसार रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेश व्यवहार अवगत व्हावे यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे जागृती करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कॅशलेश जागृती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून या अभियानाला सुरुवात केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, लिड बँक व्यवस्थापक विजय बागडे व उमेश महतो उपस्थित होते. या चित्ररथावर एलसीडी व अद्यायावत माहिती असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. रोखरहित व्यवहार कसे करावे यासंबंधी चित्रफित (व्हीडीओ) दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांची रोखरहित व्यवहारासंबंधी जागृती करण्यात येणार आहे. हा चित्ररथ ग्रामीण भागात १७ दिवस फिरणार आहे.
यात प्रामुख्याने डिजीटल पेमेंट, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट आॅफ सेल मशीन, ई-बटवा व आधारकार्ड एनेबल पेमेंट याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पेमेंट आता कॅशलेश पध्दतीने करण्यचा शासनाचा आदेश आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांना रोखरहित व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने या चित्ररथाचे अयोजन करण्यात येत आहे.
कॅशलेश होतांना नागरिक आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पाच सोप्या पध्दतीने करु शकतात. यासाठी आपला मोबाईल आपला बटवा होणार आहे. यात युपीआय अ‍ॅप्स, युएसएसडी पध्दती, ई-वॉलेट, बँक कार्डस व पॉईंट आॅफ सेल मशिन आणि आधार एनेबल पेमेंट पध्दतीचा समावेश आहे. कॅशलेश महाराष्ट्रासाठी व नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्हयातील गावागावात हा चित्ररथ फिरणार आहे.
या कॅशलेश व्यवहाराच्या पाचही मुद्यांची माहिती या चित्ररथावर देण्यात आली आहे. पहिल्या तीन मुद्याबाबत म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस (वढक), ई-वॉलेट, कार्ड्स, पीओएस, स्मार्ट मोबाईल व इंटरनेट सुविधा आवश्यक असून उर्वरित दोन मुद्याबाबत म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (अएढर), अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी) स्मार्ट मोबाईल व इंटरनेटची आवश्यकता नसणार आहे.
विशेष म्हणजे पीओएस मशीनद्वारे कार्ड स्वाईप करुन कसे व्यवहार करायचे याबाबत बँक प्रतिनिधी नागरिकांना डेमो दाखविणार आहे. हा चित्ररथ गावांसह काही महाविद्यालयातही जाणार आहे. हा चित्ररथ जेव्हा आपल्या गावात येईल तेव्हा नागरिकांनी रोखरहित व्यवहाराची कार्यप्रणाली समजावून घेवून कॅशलेश अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. (नगर प्रतिनिधी)