पवनी येथील घटना : आरोपी तरूणाला अटक
भंडारा : घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्य जाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण केले. यात ती गर्भवती राहिल्यामुळे हा गंभीर प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आरोपी तरूणाला अटक केली असून प्रकरणामुळे पवनी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पवनी येथून जवळच असलेल्या पवना (खु.) गावातील हा संतापजनक प्रकार आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी प्रदीप दिघोरे (२३) याला अटक केली आहे. पवना येथील पीडित मुलगी ही १६ वर्षे वयाची आहे. आरोपी तरूण हा त्याच गावातील रहिवासी असून पीडितेच्या घराशेजारी राहतो. पीडित मुलगी ही नववीपर्यंत शिकलेली आहे. तर हा तरूण मजुरीचे काम करीत असल्याचे पवनी पोलिसांनी सांगितले.
पीडित मुलगी व तरूण हे दोघेही एकाच समाजाचे असून घराशेजारी राहतात. दीड वर्षापूर्वी त्यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर या तरूणाने लग्न करण्याचे आमिषे देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यात ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर या मुलीने या तरूणाला याबाबत सांगितले. त्यानंतर त्याने ‘तो मी नव्हेच’ची भूमिका घेतली. मुलीने सदर बाब कुटुंबीयांना सांगितल्यानंतर सोमवारला पवनी पोलीस ठाण्यात त्या तरूणाविरूध्द तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पवनी पोलिसांनी प्रदीप दिघोरेविरूध्द भादंवि ३७६ (२), (आय) (एन), सहकलम ४, ६ बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुहास चौधरी करीत आहे. याप्रकरणी आरोपीला मंगळवारला न्यायालयात हजर करण्याची पोलिसांनी तयारी केली. मात्र, त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने रूग्णालयातून सुटी झाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असता न्यायाधीशांनी आरोपीची रूग्णालयातून सुटी झाल्यानंतर हजर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)

आरोपीला हलविले नागपूरला
याप्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला पवनी त्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिक खालावल्यामुळे त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती तपास अधिकारी सुहास चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.
तपासणीत मुलगी गर्भवती
पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सोमवारला पवनी येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवून तपासणी करण्यात आली.