Pavani villagers reminds the memories of Major Praful Moharkar. | शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या आठवणीने अवघे पवनी गाव गहिवरले..

ठळक मुद्दे खाऊऐवजी पुस्तके आणा

नंदू परसावार / अशोक पारधी।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : लहानपणापासूनच त्याला वाचनाची आवड होती. वडील नागपुरला गेले की खाऊऐवजी पुस्तके आणा, असे तो आग्रहाने सांगायचा. नागपूरच्या सोमलवार शाळेत शिकताना प्रहारच्या उन्हाळी शिबिरात तो भाग घ्यायचा. तेव्हापासूनच सैन्यात जाण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली. पुढे इंजिनिअर होऊन तो सैन्यात रूजू झाला. आज त्याच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता, त्याला भेटण्यासाठी आम्ही जात होतो, पाणावलेल्या डोळ्यांनी मुलाच्या आठवणी सांगताना या वीरमातेने हंबरडा फोडला तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले...
काश्मिरच्या राजोरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल अंबादास मोहरकर (३२) हे शहीद झाले. ही वार्ता रात्री पवनी तालुक्यात पसरताच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी एकच गर्दी केली. घरी आईवडील नसतानादेखील शोकमय पवनीवासीय त्यांच्या घरासमोर एकत्रित होऊन आठवणींना उजाळा देत होते.
मोहरकर परिवार मूळचे पवनी तालुक्यातील जुनोना येथील रहिवाशी असून अंबादास मोहरकर हे वलनी येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर पवनीत भाईतलाव वॉर्डात घर बांधून ते स्थायिक झाले.
मेजर प्रफुल यांची आई सुधाताई या शिक्षीका असून मोठा मुलगा मेजर तर लहान मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान, शनिवारला लहान मुलाच्या भेटीसाठी ते नागपूरहून पुण्याकडे निघाले होते. दरम्यान, मोठा मुलगा प्रफुल हा चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांना मिळाली.
त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून रात्री उशिरा ते पवनीला पोहोचले. त्यावेळीही घरासमोर लोकांची गर्दी बघून मेजर प्रफुल्ल यांच्या आईने हंबरडा फोडला, तेव्हा अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. जुनोना मूळगाव असले तरी आई भिवापूर तालुक्यात शिक्षिका असल्याने प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी व पूर्व माध्यमिक शिक्षण तास ता.भिवापूर येथे झाले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सोमलवार हायस्कुलमध्ये झाले. त्यावेळी प्रहारच्या उन्हाळी शिबिरात जात होता. तेव्हापासून त्यांना देशसेवेत रूजू होण्याचा ध्यास लागला होता.
रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर एनडीएची परीक्षा देऊन मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. डेहराडून, खडकवासला पुणे येथे शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे लेफ्टनंट या पदावर ते रूजू झाले.
त्यानंतर पदोन्नतीने अल्पावधीतच ते मेजर या प्रमुख पदावर पोहचले. मेजर म्हणून सीमावर्ती भागात टेहळणी करीत असताना पाकिस्तानी लष्करांच्या गोळीबारात त्यांना विरगती प्राप्त झाली. पवनी तालुक्यात आतापर्यंत भारतीय सैन्यदलात मेजर या पदावर पोहचणारे ते पहिले होते. पवनीवासियांना त्यांचा सार्थ अभिमान होता.
वीरपुत्राच्या दु:खामुळे पवनी येथील व्यापारी संघ व ड्रगिस्ट व केमीस्ट असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेऊन शोक पाळला.

मुलगा शहीद झाल्याचे दु:ख आहे, परंतु देशाची सेवा करताना शहीद झाल्याचा अभिमान वाटतो. देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी कार्य करणाऱ्या सैनिकांच्या संरक्षणासाठी शासनाने सतर्कता बाळगली पाहिजे. पाकिस्तानी लष्कराला शासनाने धडा शिकवावा.
- सुधाताई मोहरकर, (प्रफुल्ल यांची आई)


प्रफुल्ल सोज्वळ व सुसंस्कृत होते. जावई असले तरी ते आम्हाला मुलाप्रमाणे होते. माझा मुलगा अभिषेक व प्रफुल्ल हे दोघेही एकाचवेळी सैन्यात अधिकारी म्हणून रूजू झाले. प्रफुल्ल हे व्हॉलिबॉल, फुटबॉल व हॉकीचा उत्तम खेळाडू होते.
- विजय शिंदे, पुणे. (प्रफुल्ल यांचे सासरे)


मेजर प्रफुल्ल मोहरकर हे देशासाठी शहीद झाले. त्यांचा पवनीवासियांना सार्थ अभिमान आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पवनी शहरात शहीद स्मारक उभारण्यात यावे.
- विलास काटेखाये, अध्यक्ष, नगर विकास आघाडी.


प्रफुल्ल मनमिळाऊ स्वभावाचा होता. दिवाळीपूर्वी तो पवनीला आला असताना त्याच्यासोबत गप्पा मारताना तो म्हणाला, सीमेवर नेहमीच तणावपूर्ण वातावरण असते. आम्हाला नेहमीच फायरिंग अनुभवायला मिळते. असे प्रफुल्लच्या आठवणी सांगताना अश्रुंना वाट मोकळी करून दिली.
- मनोज झिलपे, (प्रफुल्ल यांचा मित्र)


Web Title: Pavani villagers reminds the memories of Major Praful Moharkar.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.