नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:58 PM2019-05-25T13:58:12+5:302019-05-25T13:59:23+5:30

प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली.

Only 8.8% water stock in 384 projects in Nagpur division | नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत केवळ ८.८ टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देवाढत्या तपमानाचा फटकादीड महिन्यात १० टक्के घट

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : प्रचंड तापमानाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांच्या जलसाठ्या झपाट्याने घट येत असून नागपूर विभागातील ३८४ प्रकल्पांत २५ मे रोजी केवळ ८.८ टक्के जलसाठा असल्याची नोंद घेण्यात आली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १७.६९ टक्के साठा होता. अवघ्या दीड महिन्यात जलसाठ्यात दहा टक्के घट नोंदविण्यात आली. पावसाळा लांबला तर जलसंकट गडद होण्याची शक्यता आहे.
नागपूर विभागात नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत ३८४ सिंचन प्रकल्प आहेत. सध्या १६ मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, ४२ मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि ३२६ लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये १२.५१ टक्के जलसाठा होता. यंदा झालेला अपुरा पाऊस आणि तापत्या उन्हामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होत आहे.
नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २२७.१९ दलघमी असून एकुण जलसाठा १००१ दलघमी आहे. ४२ मध्यम प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ९२.०५ दलघमी असून एकुण जलसाठा १६५.०६ दलघमी आहे. ३२६ लघू प्रकल्पात ९०.०८ दलघमी जलसाठा असून एकूण जलसाठा १४३.०२ दलघमी आहे. गतवर्षी मोठ्या प्रकल्पात ११.९२ टक्के, मध्यम प्रकल्पात १५.४२ टक्के आणि लघु प्रकल्पात १२.९२ टक्के जलसाठा होता. यंदा असलेल्या जलसाठ्याच्या तुलनेत ४ टक्के घट आली आहे. दरवर्षी जलसाठ्यात घट येत असून जलपुनर्भरणासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यातच प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून सिंचनाच्या उद्देशाला हरताळ फासला जातो.
वाढत्या तापमानाने प्रकल्पातील जलस्तर घटत आहे. विदर्भाचे तापमान ४५ अंशाच्या पार पोहचले आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी घटत आहे. यंदा पावसाळा लांबला तर पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र
तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारात सध्या गावागावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गावागावांतील प्रकल्प तळाला जात आहेत. काही प्रकल्प तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र त्यानंतरही गावागावांत पाण्यासाठी ओरड सुरु आहे. भंडारा हा टँकरमुक्त जिल्हा असल्याने जिल्ह्यात कुठेही टँकर सुरु नाही. परंतु भंडारा शहरात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

Web Title: Only 8.8% water stock in 384 projects in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.