शौचालयाचे निर्माण करण्याचा सल्ला : मुरली गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर
भंडारा : चांदपूर धार्मिक स्थळाच्या पायथ्यालगतच्या ग्राम पंचायत मुरली हागणदारीमुक्तीच्या वाटेवर असून अद्याप शौचालय बांधकाम न केलेल्या कुंटुबाकडे सहाय्यक गट विकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी प्रत्यक्ष भेट देवून स्वच्छतेचा मंत्र दिला. तसेच शौचालयाचे निर्माण करून कुटूंब लयभारी करण्याचा सल्ला दिला.
गट विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्लाने कुटूंबाच्या मदतीने घरी शौचालयाचे बांधकाम करून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच चेतना शरणागत माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
तुमसर तालुक्यात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाची अंमलबजावणी गट विकास अधिकारी गिरीष धायगुडे यांचे मार्गदर्शनात तर सहाय्यक गट विकास अधिकारी हिरुडकर यांचे नेतृत्वात सुरु आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावागावात जावून नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची सुविधा उपब्ध करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. तुमसर तालुक्यातील चांदपूर धार्मिकस्थळालगतच्या मुरली येथील ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या टप्यात गाव हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. १३० शौचालयाचे उदिष्ठ्य असून त्यापैकी १२८ शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे.
दोन शौचालयाचे बांधकाम उर्वरित आहे. त्यामुळे गाव हागणदारीमुक्त करण्याच्या हेतूने सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी शनिवारला मुरली ग्राम पंचायतला भेट दिली व ग्राम पंचायत हागणदारी मुक्तीची स्थिती जाणून घेतली. यावेळी सरपंच चेतना शरणागत यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप तीन कुटूंबांनी बांधकाम केले नसल्याचे सांगितले.
दरम्यान सहा. गट विकास अधिकारी यांनी प्रत्यक्ष शौचालयाचे बांधकाम न केलेल्या राजेंद्र रहांगडाले यांचे घर गाठले व त्यांच्याकडे शौचालयाच्या स्थिती बाबत जाणून घेतले. यावेळी घरी उपस्थित शिक्षिकेचे अभ्यासक्रम पूर्ण करीत असलेल्या त्यांच्या मुलीकडून शौचालय बांधकाम न केल्याचे कारण जाणून घेतल्यानंतर कुटूंबातील प्रत्येकासाठी स्वच्छतेचा मंत्र दिला.
स्वच्छतेचा मंत्र देताना, घरातल्या बालकाचे उदाहरण दिले. घरातला छोटा बालक घराच्या पुढे रस्त्यालगत शौचास जातो. शौचास करतेवेळी तो बालक हातात काडी घेवून मातीवर मनात आलेले विचार रेखाटत असतो. शौचविधी आटोपल्यावर आई बालकाला काळजी घेते मात्र हात स्वच्छ करायला विसरते.
अस्वच्छ हाताच्या माध्यमातून बालकाला आजाराची लागण होते. पर्यायाने बालकाला दवाखाण्यात नेवून त्याच्यावर उपचार केले जातात. त्याच्या प्रकृतीवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. हा प्रकार आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे निर्माण होत असतो.
या उदाहरणातून कुटूंबातील छोटा असो व मोठा त्याला शौचालयाची गरज असतेच, असे सांगून स्वच्छतेशिवाय कुटूंब परिपूर्ण होवून शकत नाही हे पटवून दिले. सहा.
गट विकास अधिकाऱ्यांनी छोट्या बालकाच्या उदाहरणातून शौचलायाचे महत्व, बांधकाम व वापर गरजेचे असल्याचे सांगून बांधकाम करण्याचा सल्ला दिला. आई वडिल घरी नसल्याने मुलीने कुटूंबात शौचालय बांधकाम करण्याचे सांगून गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर वृद्ध गजानन वाघमारे यांच्या घरी भेट देवून बांधकाम केलेल्या शौचालयाची पाहणी व वापर करण्यासाठी विनंती केली. तसेच शौचालयाचे बांधकाम न केलेल्या शिशुपाल मरस्कोल्हे यांचे घरी भेट दिली.
यावेळी घरी असलेल्या महिलांसोबत संवाद साधून कुटूंबातील प्रत्येकासाठी शौचालयाचे बांधकाम करण्याची विनंती केली. या प्रसंगी उपस्थित महिलेने रविवार पासूनच शौचालय बांधकाम करण्याचा श्रीगणेशा करणार असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी गावात येवून कुटूंबाच्या भेटी घेऊन शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरपंच शरणागत यांनी उपस्थितांचे आभार मानले. (प्रतिनिधी)