MLA assault case Karemore bailout | आमदाराला मारहाणप्रकरणी डॉ. कारेमोरे यांना जामीन
आमदाराला मारहाणप्रकरणी डॉ. कारेमोरे यांना जामीन

ठळक मुद्देतुमसरात अद्याप तणाव : न्यायालयाने फेटाळली पोलीस कोठडीची मागणी


लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा : भाजपचे आमदार चरण वाघमारे आणि माजी आमदार सुभाषचंद्र कारेमोरे यांचा मुलगा अस्थी विकारतज्ञ डॉ. पंकज कारेमोरे यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ. कारेमोरे यांना तुमसर न्यायालयाने गुरूवारी जामीन मंजूर केला. गुरूवारी दुपारी ३ वाजता तगड्या पोलीस बंदोबस्तात डॉ. कारेमोरे यांना न्यायालयात नेण्यात आले.
४ फेब्रुवारीला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या जागेची तथा मंडप उभारणीच्या कामांची पाहणी करीत असताना झाड तोडण्यावरुन डॉ. पंकज कारेमोरे व आ. चरण वाघमारे यांच्यात वाद झाला होता. डॉ. कारेमोरे यांनी आ. वाघमारे यांना धक्काबुक्की केली. मध्यस्थी करणारे नगरसेवक श्याम धुर्वे यांनाही मारहाण केली होती. त्यानंतर आ. चरण वाघमारे व शेकडो कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून डॉ. पंकज कारेमोरे यांना अटक करण्याची मागणी केली.
तुमसर पोलिसांनी तात्काळ डॉ. पंकज कारेमोरे यांना अटक केली. त्यांच्या विरोधात भादंवि ३४३, (शासकीय कामात अडथडा आणणे) ५०६, २९४, ३२३ अन्वये सुद्धा दाखल केला. दरम्यान शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. बावनकर चौकात टायर पेटवून निषेध व्यक्त केला. तुमसर न्यायालयात गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात डॉ. पंकज कारेमोरे यांना आणण्यात आले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाºयांनी डॉ. पंकज कारेमोरे यांना जामीन मंजूर केला. तुमसर पोलिसांनी डॉ.कारेमोरे यांना पोलीस कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. तुमसरात सध्या तणावाची स्थिती आहे. ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा निश्चित आहे. त्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज आहे.
आमदार चरण वाघमारे यांना धक्काबुक्की प्रकरणात तुमसर न्यायालयाने डॉ. पंकज कारेमोरे यांचा जामीन मंजूर केला. पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली. ४ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांची नियोजित सभा पोलीस बंदोबस्तात होणार आहे.
-विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर.


Web Title: MLA assault case Karemore bailout
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.