निवडणूक व आयपीएलच्या सट्ट्यात लाखोंची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:42 AM2019-04-26T00:42:43+5:302019-04-26T00:43:14+5:30

शहरासह जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या सट्ट्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर, गोंदिया तथा नागपूर अशी त्याची लिंक असून काही मोठे बुकी तुमसर येथे थेट संपर्कात आहेत.

Millions of turnover in the election and the IPL | निवडणूक व आयपीएलच्या सट्ट्यात लाखोंची उलाढाल

निवडणूक व आयपीएलच्या सट्ट्यात लाखोंची उलाढाल

Next
ठळक मुद्देमोठे बुकी संपर्कात : मुंबई, दिल्ली, नागपूर कनेक्शन, तरुण आघाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरासह जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या सट्ट्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर, गोंदिया तथा नागपूर अशी त्याची लिंक असून काही मोठे बुकी तुमसर येथे थेट संपर्कात आहेत. कमी वेळात आणि कमी श्रमात पैसा कमावण्याच्या नादात तरुण या सट्ट्याच्या नादी लागल्याचे दिसत आहेत.
तुमसर शहर व तालुका कुबेराचे माहेरघर म्हणून संबोधले जाते. नैसर्गिक साधन संपन्नता येथे अधिक आहे. यात रेती तस्करी व मॅग्नीज, खंडणी वसुली, कर्जप्रकरणात मोठी उलाढाल होते. यातून तरुणाईकडे मोठा पैसा उपलब्ध होतो. श्रीमंत कुटुंबांची संख्याही येथे मोठी आहे. यापूर्वी येथील मोजकीच मंडळी सट्टा व्यवसायात गुंतली होती. परंतु सध्या त्यात मोठी वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, रामटेक यासह विदर्भातील विविध मतदार संघात कोण निवडून येणार यावर सट्टा लावला जात आहे. सट्ट्यात पैसे लावणारे मध्यमवर्गीय मजुरी करणारे आणि काही शिक्षण घेणारे तरुण आहेत. तुमसर येथे चार ते पाच बुकी असून त्यांचे कनेक्शन मुंबई, दिल्ली व देशातील मोठ्या शहरात आहे. दिवसाला २० ते ४० लाखांचा सट्टा येथे खेळला जात आहे. सीमावर्ती मध्यप्रदेश, छत्तीसगड पर्यंत मोबाईलवरून हा गोरखधंदा सुरु आहे. आयपीएलचे सत्र सुरु असून त्याचे मोठे वेड तरुणांना लागले आहे. खेळाची मौज सोडून पैज लावण्यावर युवक धन्यता मानत आहेत. त्यातून अनेक जण कर्जबाजारी झाल्याचे दिसून येते. सट्ट्याच्या लालसेपायी अनेक तरुणात नैराश्य आल्याचेही बोलले जाते. सट्टा लावणाऱ्यात १५ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. अनेकांनी सट्ट्यात पैसे गुंतविल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु अद्यापही अशा सट्ट्यांवर जिल्ह्यात कुठेही धाड टाकण्यात आली नाही.
पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
तुमसर शहरासह जिल्ह्यात निवडणूक व आयपीएलवर मोठ्या प्रमाणात सट्टा लागत असल्याची माहिती पोलिसांना आहे. परंतु त्याविरोधात येथे कारवाई केली जात नाही. पोलिसांकडे गोपनीय नेटवर्क असते. त्यांचे खबरे असतात. परंतु अद्यापर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात सापळा रचला नाही. जिल्हा स्तरावरून दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
उधारीचा व्यवसाय
निवडणूक व आयपीएल निकालासंदर्भात भ्रमणध्वनीवरून सट्टा उधारीत लावला जातो. पैशाच्या लालसेपोटी युवक त्यात गुंतले आहेत. कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशावेळी सट्टा लावणारे दहशतीत वावरताना दिसत आहे. त्यांच्यात नैराश्य व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या शहरातील लोण आता तालुका व गावपातळीवर पोहचले आहे.

Web Title: Millions of turnover in the election and the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.