लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालय 'सलाईनवर'...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 01:38 AM2018-10-24T01:38:55+5:302018-10-24T01:39:40+5:30

ग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांची दुरवस्था व खासगी रुग्णालयातील भरमसाट शुल्कामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरीकही मेटाकुटीला आले आहेत. सर्वसामान्यांना स्वस्तामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये उभारली.

Millennium rural hospital 'salalwar' ...! | लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालय 'सलाईनवर'...!

लाखांदुरातील ग्रामीण रुग्णालय 'सलाईनवर'...!

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यातील विदारक वास्तव : मूलभूत सुविधांअभावी रुग्णांना सोसावा लागतो आर्थिक फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : ग्रामीण रुग्णालयात मुलभूत सुविधांची दुरवस्था व खासगी रुग्णालयातील भरमसाट शुल्कामुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय नागरीकही मेटाकुटीला आले आहेत. सर्वसामान्यांना स्वस्तामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने ग्रामीण रुग्णालये उभारली.
मात्र, या रुग्णालयांचा कारभार अत्यंत दयनीय स्थितीत असून, मोडक्या व गंजलेल्या खिडक्या, मोकाट जनावरं, एक्स रे, सोनोग्राफी मशिन तंज्ञ, रूग्ण खाटांचा अभाव, अवस्छता, औषधाचा तुटवडा हे विदारक वास्तव लाखांदूर ग्रामीण रुग्णालयाच आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
तालुक्यात ६१ ग्रामपंचायत व स्थानिक लाखांदुरला नगरपंचायत असून साधारण एक लाख २४ हजार १५३ इतकी लोकसंख्या आहे. इथल्या एकूलत्या एक ग्रामीण रुग्णालयातही चांगल्या सुविधा मिळत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी थेट भंडारा, ब्रम्हपुरीला जावे लागते.
अपुरे बेड, सोनोग्राफी मशिन, एक्स रे मशिन तसेच सीझरसाठी आवश्यक भूलतज्ञही इथे उपलब्ध नाही. औषधांचा तुटवडा दिसून येत असून 'लोकमत'ने हे विदारक वास्तव समोर आणले आहे. रक्त तपासणी केंद्राचीही दुरावस्था यातून समोर आली आहे.
खासगी रुग्णालयांचा भुर्दंड. शासकीय यंत्रणेची अशी वाताहत लागल्यामुळे खासगी रुग्णालये सुसाट चालली आहेत. लाखो रुपयांचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकाला बसत आहे. खासगी रुग्णालयातील शुल्कावर कोणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे जमीन व दागिने विकून नागरिकांना देणी भागवावी लागत आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष. आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालेला असताना लोकप्रतिनिधींना त्याचे काही सोयरसुतक नसल्याची स्थिती आहे. कोणताच लोकप्रतिनिधी याबाबत आवाज उठवताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वाली नसल्यासारखी स्थिती आहे. अस्वच्छ परिसर. एकीकडे स्वच्छ भारत मिशनची दवंडी पिटवली जात असताना या रुग्णालयाचा परीसर, स्वच्छातागृह, कर्मचाऱ्यांचे वसतीगृह यांच्याकडे दुर्लक्षच झाल्याचे समोर आले आहे.
एक्स रे तज्ञ नाही. प्राथमिक उपचार, अपघात, आजारपण यासाठी आलेल्या रुग्णांना या ठिकाणी एक्स रे काढण्यासाठी मशिन आहेत. याठिकाणी हे मशिन चालविण्यासाठी जे तज्ञ आहेत.
त्यांना एक्सरेच काढता येत नसून, आलेल्या रुग्णांना खाजगी ठिकाणी जावे लागते.
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कमतरता
दीड लाखाच्या आसपास तालुक्याची लोकसंख्या असून, रुग्णालयात दररोज शेकडोहून अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. पंन्नास ते साठ रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचार घ्यायला येतात. मात्र, मंजूर खाटांच्या प्रमाणातही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरलेली नाही. कर्मचाऱ्यांचीही तीच अवस्था आहे. या कमतरतेमुळे रुग्णाला योग्य सुविधा मिळत नाही. अनेक महिने शस्त्रक्रिया रखडतात. रुग्णालयाच्या एकंदर कामकाजाला शिस्त नसल्याने रुग्णांची परवड होत आहे.
वेळेवर उपलब्धता नाही
तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव ही खरी रुग्णालयाची डोकेदुखी आहे. सध्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर जिल्हा शल्य चिकित्सकांचे नियंत्रण नाही. काही वैद्यकीय अधिकारी नावापुरतेच रुग्णालयात येतात.

ग्रामीण रुग्णालये कशासाठी....?
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण रुग्णालयांत शस्त्रक्रीया होत नाहीत. ग्रामीण रुग्णालयांना अधीक्षकच नाहीत. तेथील बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागांतील लहान मुले व स्त्रियांच्या किरकोळ समस्यांनाही खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो किंवा त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे ग्रामीण रुग्णालये असूनही जिल्हा रुग्णालयावरील ताण वाढतो आहे.
तज्ज्ञ डॉक्टर मात्र औषधाचा तुटवडा
सामान्य रुग्णालय लाखांदूर येथे डॉ.सुनिल रंगारी, डॉ.आकांक्षा घरडे, डॉ.अंकुर बंन्सोड यांच्यासारखे अनुभवी व तंज्ञ डॉक्टर असून, रुग्णांचा योग्य उपचार केला जात आहे. मात्र रुग्णालयात आवश्यक इन्जेक्शन व औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांसह डॉक्टरांना मनस्ताप होत आहे.

Web Title: Millennium rural hospital 'salalwar' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.