वातावरणात गारठा : शेकोट्यांची संख्या वाढली
भंडारा : बोचऱ्या थंडीची जाणीव पुन्हा भंडारेकरांना चाखायला मिळत आहे. वातावरणात गारठा वाढला असून पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे.
कालपासून जिल्ह्यात गारठा वाढला आहे. जिल्हावासियांना बोचऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. आज पारा नऊ अंशावर पोहचला़ हिवाळा ऐन भरात असताना जिल्हावासियांना सध्या या थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटेदरम्यान कडाक्याची थंडी पडत आहे. दवबिंदूचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागासह आता शहरातही सायंकाळपासून शेकोट्या पेटत आहेत. रात्रीला शहरात थंडीमुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. नागरीकांची दिनचर्या सकाळी उशीरा सुरू होत असल्याचे निदर्शनास येत आहे. थंडीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे. घोंगडे, स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी ऊनी वस्तू बाहेर निघाल्या आहेत. थंडीची चाहुल फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मागील २० वर्षोत सर्वाधिक कमी तापमान ५ अंश सेल्सिअस सन २०१२ मध्ये दि.१४ जानेवारी रोजी नोंद करण्यात आली होती. सन २००५ मध्ये दि.२६ आणि २७ डिसेंबर रोजी ६ अंश सेल्सिअस नोंद करण्यात आली होती. यापुर्वी सर्वाधिक थंडी सन २००३ मध्ये ३० डिसेंबरला जाणवली होती.(प्रतिनिधी)