रक्तदानासाठी जयदीपची सायकल भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:57 PM2019-01-23T22:57:06+5:302019-01-23T22:57:42+5:30

फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास.

Jaideep's bicycle cruise for blood donation | रक्तदानासाठी जयदीपची सायकल भ्रमंती

रक्तदानासाठी जयदीपची सायकल भ्रमंती

Next
ठळक मुद्देदेशभर करणार प्रसार : पश्चिम बंगालच्या तरुणाचा १३ राज्यात प्रवास

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : फुटबॉल खेळताना अपघात झाला. एक तरुण मृत्यूच्या दारात पोहचला. त्यावेळी रक्ताची अत्यंत गरज होती. मात्र जेथे कुटुंबियांनीच नकार दिला तेथे दुसऱ्यांचे काय? अशा परिस्थितीत एका रक्तपेढीने पुढाकार घेत त्याला रक्त उपलब्ध करुन दिले आणि तेथून सुरु झाला त्याच्या रक्तदान चळवळीचा प्रवास. जयदीप राऊत असे या अवलीयाचे नाव असून पश्चिम बंगालचा हा तरुण चक्क सायकलने भारतभर भ्रमंती करीत रक्तदानासाठी नागरिकांना प्रेरीत करीत आहे.
साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी सायकलवरून एक तरुण आला. सायकलला तिरंगा झेंडा आणि समोर एक फलक लावलेल्या या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अधिक चौकशी केली तेव्हा हा तरुण रक्तदान चळवळीसाठी स्वत:ला वाहून घेतलेला निघाला. पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्यातील जयदीप राऊत हा तरुण आपल्या सायकलने भारतभर भ्रमंती करीत आहे. फुटबॉल खेळत असताना त्याला जबर दुखापत झाली. त्यावेळी चार बॉटल रक्ताची त्याला आवश्यकता होती. परंतु त्याच्या कुटुंबियांनी रक्त देण्यास नकार दिला. अखेर एका रक्तपेढीच्या पुढाकाराने त्याला जीवदान मिळाले. स्वत:वर ओढवलेल्या या संकटाने त्यांना रक्तदानाचे महत्व कळले. हीच बाब देशवासीयांना कळावी म्हणून पुढाकार घेतला. गत चार महिन्यांपासून ते सायकलने भारतभर फिरत आहेत.
झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि आता तो महाराष्ट्रात पोहचला आहे. आतापर्यंत नऊ राज्यात पाच हजार किलोमीटर सायकलने प्रवास केला आहे. साकोली येथे लहरीबाबा मठात उपस्थितांना रक्तदानाविषयी त्यांनी प्रेरित केले. यावेळी डॉ.केशव कापगते, डॉ.भास्कर गायधने, डॉ.अमोल बडवाईक, डॉ.अजय तुमसरे, डॉ.रवींद्र कापगते, डॉ.छाया कापगते, डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भात मिळाला उत्तम प्रतिसाद
जयदीप राऊत हा मुंबई, नाशिक, औरंगाबाद मार्गे विदर्भात दाखल झाला. अकोला, अमरावती, नागपूर असा प्रवास करीत तो भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. या मोहीमेत ठिकठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाने आपली आस्थेने चौकशी करून कोणतीही अडचण येऊ दिली नाही. रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे सांगतो.

Web Title: Jaideep's bicycle cruise for blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.