भंडाऱ्यात कारवाई : दोघांना अटक, आणखी काही आरोपींचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्या जगभरात आयपीएल क्रिकेट सामन्याचे सत्र जोरात सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात बाहेरून छोटे-मोठे बुकी येऊन लाखोंचा व्यवहार सुरू असल्याच्या गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलिसांनी धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक एलसीडी, एक रिमोट, सेटअप बॉक्स, व्हीडीओ, आॅडीओ यासह २५,०७० रूपये रोख जप्त करण्यात आले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदान्वये भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश धुसर यांना क्रिकेट बुकींवर धाड घालण्याकरिता सांगितले.
यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची गोपनीय यंत्रणा गठीत करून जिल्ह्यात खबरी नेमले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा शहरातील नाईक कोटी येथील राजेश सोमाजी क्षीरसागर याच्या घरी त्याचा सहकारी बालू सदाशिव बाणेवार रा.गांधी चौक याच्यासह आयपीएल क्रिकेट थेट प्रक्षेपण सामन्यातील राइजिंग पुणे सुपर जाइंट विरुद्ध मुंबई इंडियन्स या संघात खेळल्या जात असलेल्या सामन्यावर काही इसम क्रिकेटच्या थेट प्रक्षेपणावर मोबाईल संचाद्वारे लोकांकडून पैसे घेऊन सट्टा लावत होते. क्रिकेट सट्टा खेळत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली.
यात दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक एलसीडी, एक रिमोट, युसीएन कंपनीचा सेटअप बॉक्स, व्हीडीओ आॅडीओ असे २५,०७० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी राजेश क्षीरसागर व बालू बाणेवार या दोघांचे क्रिकेट सट्ट्या संबंधीतील सहकारी व संपर्कातील आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असून यात मोठे मासे अडकण्याची शंका वर्तविण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक विनिता साहू, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रिजवी, सहायक फौजदार नेपाल टिचकुले, पोलीस हवालदार धर्र्मेंद्र बोरकर, पोलीस नायक बबन अतकरी, पोलीस शिपाई वालदे, रमाकांत बोंदरे व हरिदास रामटेके यांनी केली आहे. लाखनी पोलीस ठाणे हद्दीतील आदर्श कॉलनीतही आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली किंवा नाही याबाबतही जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.

चोरीच्या घटनांमध्य वाढ
भंडारा शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासन भुरट्या चोरांचा शोध घेत असले तरी चोरींच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषत: घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस प्रशासनातर्फे सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी चोरांचे मनसुबेही बुलंदीवर आहेत. अशा स्थितीत पोलिसांकरवी रात्रीच्या सुमारास गस्त लावणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्ह्यात लग्नसराईची धुम असताना चोरीच्या घटनांमुळे चोरांचेही चांगलेच फावले आहे. याकडे नागरिकांनीही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.