फिल्मी स्टाईलने उडविले भंडारा जिल्ह्यातील बँक खात्यातून ३.७० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:55 PM2018-04-14T12:55:00+5:302018-04-14T12:55:11+5:30

आॅनलाईन व्यवहाराच्या नावावर इंटरनेट बँकिंग प्रणालीतून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील एका अधिकाऱ्याची ३ लाख ७० हजार रुपयाने फसवणूक करण्यात आली.

Film style flown out of Bhandara district 3.70 lakhs from bank account | फिल्मी स्टाईलने उडविले भंडारा जिल्ह्यातील बँक खात्यातून ३.७० लाख

फिल्मी स्टाईलने उडविले भंडारा जिल्ह्यातील बँक खात्यातून ३.७० लाख

Next
ठळक मुद्देआॅनलाईन व्यवहाराचा फटकासायबर सेलकडे तपास

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅनलाईन व्यवहाराच्या नावावर इंटरनेट बँकिंग प्रणालीतून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीतील एका अधिकाऱ्याची ३ लाख ७० हजार रुपयाने फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे ग्राहकाकडून कोणतीही माहिती न घेता त्यांचे खाते व मोबाईल हॅक करून हा दरोडा घालण्यात आला. बी. सम्पथैय्या असे फसवणूक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात हात टेकले असून तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
वरठी येथील सनफ्लॅग आयरन अँड स्टील कंपनीत बी. सम्पथैय्या महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. स्टेट बँक आॅफ इंडिया भंडारा येथे त्यांचे खाते असून आठ वर्षांपासून ते इन्टरनेट बँकिंग व्दारा व्यवहार करतात. मार्च महिन्यात त्यांनी नोकरी सोडून स्वगावी जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांनी १० वर्षांपासून जमा असलेले सर्व प्रकारचे बचत खाते व मुदत ठेव मोडून बचत खात्यात संपूर्ण पैसे वळविले. त्यामुळे त्यांच्या खात्यावर ४ लाख रुपये जमा होते. त्यांना ६ एप्रिलच्या मध्यरात्री पासून ते सकाळपर्यंत बँकेतील खात्यासोबत जोडलेल्या मोबाईल नंबरवर संदेश आले. यात १५ ओटीपीचे तर इतर ‘थर्ड पार्टी ओटीपी संदेश होते. यादरम्यान त्यांच्या खात्यातून विविध मार्गाने ३ लाख ७० हजार रुपये काढण्यात आले. खात्यातून उडविण्यात आलेल्या रक्कमेकरिता वापरण्यात आलेले दोन खाते ६ एप्रिलच्या मध्यरात्री आॅनलाईन उघडण्यात आले होते.
सदर बँक खाते कोटक महिंद्र या बँकेत उघडले असून त्यातील एक खाते कोलकात्ता व दुसरे खाते अर्ध्या तासाच्या अंतराने चंदीगड येथून उघडण्यात आल्याचे बँकेच्या स्टेटमेंटनुसार दिसते. बंगलोर येथील खाते जुने आहे. बंगलोर येथून एटीएम केंद्रातून काही रक्कम काढण्यात आली होती. यावरून हे रॅकेट या शहरातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अजित पाल यांचे नावे ८० हजार व वैशाली यांचे नावे ९५ हजार रुपयाची आॅनलाईन खरेदी व मुन्नगाई यांनी ९५ हजार रोकड आणि ५ हजार रुपये बंगलोर येथील एटीएम मधून काढली. उर्वरित रक्कमेपैकी ५० हजार रुपये कोटक येथील सॉफ्टवेअर कंपनीच्या खात्यात वळविण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या ४२०, ६६ ( बी) ४२ आय टी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा नोंदविला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरेश ढोबळे करीत आहेत.

मोबाईल हॅक करून उडवली रक्कम
सम्पथैय्या यांच्या खात्यातून उडवलेली रक्कम मोबाईल हॅक करून उडविण्यात आली. बँक खात्याशी असलेली सर्व माहिती बँकेच्या सॉफ्टवेअर मधून चोरण्यात आली. मोबाईलवर येणारे सर्व कॉल्स व संदेश हॅकरने आपल्या मोबाईलवर वळते केले होते. सम्पथैय्या यांच्या मोबाईलवर फोन किंवा संदेश येताच फोन आपोआप ‘सायलेंट मोड’वर जायचा. त्यानुसार सर्व माहिती आपोआप समोरच्या नंबरवर वळविली जात होती. मध्यरात्री हा सर्व प्रकार सुरु असल्यामुळे त्यांना याबाबतीत काहीच लक्षात आले नाही. पोलिसांनी त्यांचा मोबाईल तपासासाठी घेतला असून या नवीन प्रकाराबद्दल त्यांनाही धक्का बसला आहे.

-तर पैसे वाचले असते
खात्यातून उडवलेले पैसे हे दुसऱ्या खात्यात पडून होते. काही रक्कम खात्यात होती. त्यामुळे सम्पथैय्या यांनी तात्काळ बँकेत जाऊन माहिती दिली. त्यानुसार व्यवस्थापकाला खाते बंद करून ज्या खात्यात पैसे वळविण्यात आले त्यांना मेल करून रक्कमे थांबविण्यासाठी सांगण्याची विनंती केली. पण बँक व्यवस्थापक कारवाईवर अडून बसले. पोलिसात तक्रार केल्याशिवाय कारवाई करणार नाही असे सांगितले. यात त्यांचा वेळ गेला. दरम्यान पुढील काही मिनिटात सम्पथैय्या यांच्या खात्यात असलेली उर्वरित रक्कमही त्यांच्या डोळ्यासमोर दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली. बँकेने त्वरित कारवाई केली असती तर पैसे वाचले असते असे सम्पथैय्या म्हणाले. एक महिन्यात रक्कम परत न मिळाल्यास बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Film style flown out of Bhandara district 3.70 lakhs from bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.