सरपंचांचा सत्कार हा गावाचा सत्कार- चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 11:57 PM2018-02-15T23:57:32+5:302018-02-15T23:57:42+5:30

निक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचांचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे.

Felicitations of the Sarpanch felicitation of the village - Chandrasekhar Bavankule | सरपंचांचा सत्कार हा गावाचा सत्कार- चंद्रशेखर बावनकुळे

सरपंचांचा सत्कार हा गावाचा सत्कार- चंद्रशेखर बावनकुळे

Next

भंडारा : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गाव विकासासह गावाचा लोकसहभागातून कायापालट करावा, अशा कर्तबगार सरपंचांचा ‘लोकमत’ने केलेला हा सहृदयी सत्कार अविस्मरणीय आहे. हा सत्कार सरपंचांचा एकट्याचा नसून संपूर्ण गावाचा सत्कार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री तथा भंडा-याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ‘लोकमत’ समूहाच्या वतीने गुरुवारला साखरकर सभागृहात आयोजित ‘सरपंच अवॉर्ड’ सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार चरण वाघमारे, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, नगराध्यक्ष सुनील मेंढे, बीकेटी ग्रुपचे एरिया मॅनेजर (महाराष्ट्र) झुबेर शेख, बीकेटीचे आॅथोराईजड डिस्ट्रीब्युटर दीपक बानकोटी, महिंद्रा ग्रुपचे डीजीएम भालचंद्र माने,  महिंद्रा ग्रुपचे ट्रेड मॅनेजर ब्रीज श्रीवास्तव, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले मंचावर उपस्थित होते.

यावेळी ना. बावनकुळे म्हणाले, गावाच्या विकासासाठी आता राज्य शासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. या योजनेतून सर्व सरपंचांनी गावाचा कायापालट करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छग्राम योजनेतून गावाचा विकास साधण्याचे ध्येय सर्वांसमोर ठेवले आहे. यातून गाव ‘स्वच्छ व सुंदर’ करून आदर्श निर्माण करावा. पालकमंत्री पांदन योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. याकरिता सर्वांनी लोकसहभागातून गावविकास साधावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे कार्य पे्ररणादायी असून त्यांचा वारसा सरपंचानी घेऊन गावाला प्लॉस्टिकमुक्त व हागणदारीमुक्त करण्याकरिता पुढाकार घ्यावा. ‘लोकमत’ने पुरस्कृत केलेल्या सरपंचांची जबाबदारी आता वाढली असून जे यावर्षी विजेते ठरू शकले नाही, त्यांनी गावाचा विकास साधून पुढल्यावर्षी पुरस्कार विजेता ठरण्याच्या दृष्टीने काम करावे, असे आवाहनही ना.बावनकुळे यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार चरण वाघमारे म्हणाले, ग्रामपंचायतस्तरावर सरपंच विकासाचा केंद्रबिंदू आहे. गावाचा विकास लोकसहभागातून शक्य आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गावविकासाचा वसा पुढे न्या. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. प्रास्ताविक लोकमतचे प्रादेशिक विभागप्रमुख गजानन चोपडे यांनी केले. संचालन विक्रम फडके आणि सखी मंचच्या जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी तर आभारप्रदर्शन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर परसावार यांनी केले.

‘सरपंच आॅफ द ईयर’ ठरल्या शिवणीच्या सरपंच माया कुथे
 लाखनी तालुक्यातील शिवनीच्या सरपंच माया कुथे यांना ‘लोकमत’ने ‘सरपंच आॅफ द ईयर’ पुरस्काराने गौरविले. ही ग्रामपंचायत आयएसओ मानांकित असून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, राज्यस्तरावर यशवंत पंचायतराज पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर दलित वस्ती सुधारणा स्पर्धा, राष्ट्रीय स्तरावर राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तसेच राज्यस्तरावर पर्यावरण विकास रत्न पुरस्कार या ग्रामपंचायतने पटकाविले आहे. ग्रामपंचायतच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे. 

३७२ ग्रामपंचायतींनी नोंदविला सहभाग
मागील काही दिवसांपासून या सरपंच अवॉर्डस सोहळ्याची भंडारा जिल्ह्यातील सरपंचांना उत्सुकता होती. जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी ३७२ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. सरपंचांनी गावातील जल व्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी मान्यवरांच्या हस्ते  पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जि.प. शिक्षण व अर्थ सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बालविकास सभापती रेखा ठाकरे, देवचंद ठाकरे, प्रमोद गभणे, चेतन भैरम, नगर पालिका उपाध्यक्ष रुबी चढ्ढा, नगरसेवक संजय कुंभलकर, नगरसेवक आशु गोंडाणे, नगरसेवक नितीन धकाते, भाजप महासचिव प्रशांत खोब्रागडे, महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, शिक्षक नेते मुबारक सैय्यद, महेश गावंडे, राजेश येरणे, बबन येरणे, हेमंत बांडेबुचे, अजय गडकरी, आनंदराव चरडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विक्रम फडके आणि सीमा नंदनवार यांनी केले. प्रास्ताविक लोकमतचे प्रादेशिक विभाग प्रमुख गजानन चोपडे यांनी केले तर आभार लोकमत जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार यांनी मानले. कार्यक्रमाला लोकमत कार्यालय प्रमुख मोहन धवड, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी, शशिकुमार वर्मा, लोकमत प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, शहर प्रतिनिधी प्रशांत देसाई, विनोद भगत, ललीत घाटबांधे, श्रध्दा डोंगरे, मनिषा रक्षीये, चित्रा झुरमुरे, कल्पना डांगरे, सुहासिनी अल्लडवार, मंगला क्षीरसागर, प्रिती मुळेवार, जयश्री तोडकर, अंजली वंजारी, सायली तोडकर, कल्पना शेट्टी आदींनी सहकार्य केले.

सरपंच हा शासन-प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा -दिलीप तिखिले
शासन व प्रशासनाचा दुवा म्हणून गावातील सरपंचांची ओळख आहे. सरपंच हे शासन आपल्या दारी नेण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. शासनानेही सरपंचाच्या कामाची दखल घेणे सुरू केले आहे. हा सरपंचाचा गौरव आहे, असा संदेश ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचे संपादक दिलीप तिखिले यांनी जिल्ह्यातील सरपंचाना दिला.
ग्रामविकासाची जबाबदारी सरपंचांवर - जिल्हाधिकारी सुहास दिवसे 
 ग्रामविकासाची धुरा सरपंचावर असून गावाचा विकास साधताना त्यांनी पंचसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. जल, जन, जंगल, जमीन आणि जनावर यावर लक्ष केंद्रीत केल्यास गावाचा पायाभूत विकास साधता येतो. कोणतेही काम करताना राजकारण न करता सर्वांना समान न्याय देण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.

सरपंच ग्रामविकासाचा कणा
प्रत्येक गाव स्वच्छ व सुंदर असायला हवे. यातून गाव विकासाची दिशा ठरणार आहे. गाव सुंदर असेल तर विकासाचे वातावरण निर्माण होईल. नागरिकांच्या जिवनमानात बदल करता येईल. शाश्वत स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. या घटकावर जिल्हाभरातील गावे मोठया प्रमाणात स्वच्छतेचा स्वीकार करीत पुढाकार घेत आहेत. त्यामुळे गावात शाश्वत स्वच्छता करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्य होण्याची गरज आहे.
- मनोजकुमार सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.भंडारा.

जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा
जिल्ह्यात नैसर्गिक स्त्रोत कमी आहेत तरीसुद्धा हा जिल्हा सर्वच क्षेत्रात अव्वल आहे. यात पोलीस विभागही मागे नाही, फिरते पोलीस पथक हा उपक्रम राज्यात मॉडेल म्हणून राबविणे सुरू आहे. सरपंचांनी गावाचा लौकीक वाढवून जिल्ह्याचा नावलौकीक वाढवावा. फिरते पोलीस पथक, मोबाईल पथक ही संकल्पना सर्वप्रथम भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आली. हा उपक्रम राज्यात राबविणे सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सरपंचानी गाव विकासाच्या नवीन उपक्रम राबवून विकासाचा पॅटर्न तयार करा. 
- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

प्रेरणा देणारा पुरस्कार
पुरस्कार हा आपल्याला प्रेरणाही देतो आणि जबाबदारीची जाणीवही करून देतो. त्यामुळे ‘लोकमत’च्यावतीने वितरीत होणाºया विविध पुरस्काराने ही जबाबदारी वाढली आहे. वाढत्या जबाबदारीतून नविन कार्याला चालना देण्याची गरज आहे. गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासाठी शाश्वत स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. गावात सरपंचांनी स्थानिक स्तरावर लोकसहभागातून पुढाकार घेतला तर शाश्वत स्वच्छता राखता येईल, यासाठी सरपंचांनी शाश्वत स्वच्छतेकरिता पुढाकार घ्यावा.
- डॉ.परिणय फुके, आमदार, भंडारा-गोंदिया

ऊर्जावान सत्कार सोहळा 
लोकमतने घेतलेल्या या पुढाकाराने तळागाळातील सरपंचाकरिता हा पुरस्कार सोहळा ऊर्जा निर्माण करणारा आहे. प्रशासनाची जबाबदारी लोकमत वृत्तपत्राने घेऊन सरपंचाच्या माध्यमातून गाव विकासाचे उद्दीष्ट अशी सांगड घालणारा हा कार्यक्रम आहे. सर्व सरपंच व पदाधिका-यांनी शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना देवून गाव विकास साधावा.
- रमेश डोंगरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद भंडारा.

सरपंच गावाचा न्यायाधीश 
शासनाच्या सर्व योजना ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत आहेत. ग्रामविकासाच्या व वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना सरपंचांनी पुढाकार घेऊन राबविण्याची गरज आहे. सरपंच गावातील न्यायाधीश असतो, त्यांनी पक्षपात न करता गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. राजकीय पक्षभेद बाजूला ठेवून सरपंचांनी नागरिकांना सेवा दिली पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करतांना गरजूंना लाभ द्यावा. 
- अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा

Web Title: Felicitations of the Sarpanch felicitation of the village - Chandrasekhar Bavankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.