भीषण तापमानामुळे मासोळ्या मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:35 AM2019-06-10T00:35:47+5:302019-06-10T00:37:31+5:30

भीषण तापमानामुळे तलावातील पाणी आटले असून सिहोरा परिसरातील तलावांमध्ये मासोळ्यांच्या मृत्यूचे तांडव सुरु आहे. या प्रकाराने मत्सपालन संस्थांना १० कोटींचे नुकसान झाले आहे. सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पाणी चार महिन्यापूर्वीच आटले आहे.

Due to the extreme temperature, the fisherman died | भीषण तापमानामुळे मासोळ्या मृत्यूमुखी

भीषण तापमानामुळे मासोळ्या मृत्यूमुखी

Next
ठळक मुद्देमत्स्यपालन संस्थेचे दहा कोटींचे नुकसान : सिहोरा परिसरातील प्रकार, तलावही पडले कोरडे

रंजित चिचखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : भीषण तापमानामुळे तलावातील पाणी आटले असून सिहोरा परिसरातील तलावांमध्ये मासोळ्यांच्या मृत्यूचे तांडव सुरु आहे. या प्रकाराने मत्सपालन संस्थांना १० कोटींचे नुकसान झाले आहे.
सिहोरा परिसरातून वाहणाऱ्या बावनथडी नदीचे पाणी चार महिन्यापूर्वीच आटले आहे. गत महिन्यात वैनगंगा नदीचे पात्रही कोरडे पडले. त्यामुळे सुकळी नकुल गावातील शिवारात नदीपात्रात दुर्गंधी येत आहे. नदीपात्रात असणारे अल्पपाणी गरम होत असल्याने मासोळ्या मृत्यूमुखी पडत आहेत. नदीपात्रात मत्स्यव्यवसाय करणारे यामुळे अडचणीत आले आहे. नद्याच्या पात्रात पाणी नसल्याने बीजोत्पादनाचे नवे संकट ओढावणार आहे.
यंदा भीषण तापमानाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. पारा ४५ ते ४६ अंशावर स्थिरावला आहे. मृग नक्षत्र लागले तरी तापमानात कोणतीही घट झाली नाही. पिण्याच्या पाण्याचे संकट झेलत असतांना आता मासेमाऱ्यांवर नवीनच संकट आले आहे. सिहोरा परिसरात तलावांची संख्या मोठी आहे. मोठ्या प्रमाणात मत्स्यपालन केले जाते. परंतु आता तापमानामुळे लाखोंच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडत आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थांचे दहा कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
तुमसर तालुक्यात २१ मत्स्यपालन संस्था आहे. या संस्थांचे ५० कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. कोणत्याही तलावात सध्या नजर टाकल्यास मृत्युमुखी पडलेल्या मासोळ्यांचा सडा दिसून येतो. त्यामुळे गावात दुर्गंधी पसरत आहे.
एकीकडे उष्ण तापमानामुळे मासोळ्या मरीत आहे. तर दुसरीकडे मत्स्यबीज संस्थांवर कर्जाचा डोंगर आहे. तब्बल ४२ लाख रुपयांची थकबाकी असल्याची माहिती आहे. परंतु आता जलशयावर संस्थेचे नियंत्रण नाही. सिहोरा येथील मागासवर्गीय बहुउद्देशीय मत्स्यपालन सहकारी संस्थेच्या तलाव नियंत्रणात असल्याने जुनी थकबाकी जशीच्या तसीच आहे. वाढत्या थकबाकीमुळे संस्था डबघाईस येत आहे. आता मासे मृत्यूमुखी पडत असल्याने नवे संकट उभे ठाकले आहे.
तुमसर तालुक्याच्या सिहोरा परिसरात मासोळ्यांची मृत्यूतांडव उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ मत्स्यपालन संस्थावर आली आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असतांना त्यावर कोणताच उपाय नाही. आता शासनानेच मत्स्यपालन संस्थाना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.
संस्थाना कर्जमाफी द्या
एका मत्स्यपालन संस्थेत २०० हून अधिक सभासद आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. नवीन बिजोत्पादनाकरिता संस्थानी कर्ज घेतले आहे. पंरतु निसर्गाच्या लहरीपणामुळे मासोळ्यांचे नुकसान होत आहे. कर्ज फेडताना अडचण येत आहे. रोजगार निर्मितीचे प्रयत्न संस्था करीत असतांना मदतीचा हात मिळत नाही. शासनाने अशा संस्थाना कर्जमाफी द्यावी अशी मागणी होत आहे.

यंदा भीषण तापमानामुळे तलावातील मासोळ्या मृत्युमुखी पडत आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे संस्थांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही. शासनाने मत्स्यपालन संस्थाची सरसकट कर्जमाफी करावी.
- राजकुमार मोहनकर
सावित्रीबाई फुले मस्त्यपालन संस्था

Web Title: Due to the extreme temperature, the fisherman died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.