सुनील मेंढे यांचे प्रतिपादन : जकातदार विद्यालयाचे स्नेहसंमेलन
भंडारा : आईवडील काबाडकष्ट करून मुलांना लहानाचे मोठे करून उच्च पदावर आरूढ करण्यासाठी जीवनभर धडपडत असतात. परंतु मुले मोठे होऊन संसारात गुंतल्यानंतर म्हाताऱ्या आईवडिलांना विसरतात. आईवडिलांना म्हातारपणी आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. त्यामुळे आईवडिलांना विसरू नका, आईवडिलांची सेवा करा असे आवाहन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केले.
भंडारा येथील जिल्हा परिषद जकातदार विद्यालयात आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे होते. यावेळी शाळा समितीचे सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य उत्तमकुमार कळपाते, योगेश हेडावू, भानुदास बनकर, मीना कुरंजेकर, प्राचार्या माया देशमुख, संयोजिका एल.पी. गणवीर उपस्थित होते. प्राचार्या देशमुख यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. अहवाल वाचन शाळाप्रमुख प्रलय गेडाम यांनी केले. सत्र २०१५-१६ मध्ये एसएससी व एचएससी परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. आभारप्रदर्शन स्रेहसंमेलन संयोजिका एल.पी. गणवीर यांनी केले. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व बौद्धिक व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्तगुणांचे प्रदर्शन करून मने जिंकली.
बक्षिस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत भिवगडे हे होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. राठोड, नितीन कुर्वे, शालू खटके, ज्योत्सना गजभिये उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)