कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:54 AM2018-05-18T00:54:30+5:302018-05-18T00:54:30+5:30

Coca-Cola Sanctuary becomes a paradise for the wildlife | कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन

कोका अभयारण्य ठरले वन्यजीवांसाठी नंदनवन

Next
ठळक मुद्देपर्यटकांचा वाढला ओघ : तृणभक्षक व हिंस्र प्राण्यांची संख्या वाढली

युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरस कि.मी. क्षेत्रात विस्तारलेला आहे. पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासनाने ५२ किमीची जंगल सफारी तयार केली आहे. डोंगरदऱ्यातील चढ-उतार, खोल दऱ्या, वळणदार रस्ते व उंच झाडांनी नटलेले अभयारण्यात सफारीसाठी विदर्भातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे. अभयारण्यात वन्यप्राणी प्रगणना झाली असून बिबट, अस्वल, रानगवा, चौसिंगा, निलगाय, चितळ आदी २० प्रकारच्या १,०६५ वन्यजीवांच्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. वन्यप्राण्यांच्या दर्शनामुळे कोका वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांसाठी नंदनवन ठरले आहे.
कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटन वाढीसाठी वन्यजीव प्रशासनाकडून विविध सुविधा करण्यात आले आहेत. याशिवाय हॉटेल, खानावळींची सुविधा ग्रामस्थांच्या माध्यमातून पुरविली जात आहे. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी टेकडीवर इंग्रजकालीन कोका वनविश्रामगृहाचा कायापालट करण्यात आला असून वातानुकुलीत करण्यात आले आहे. आसाम पॅटर्नचे बांबूची राहुटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या अभयारण्यात वन्यजीवांचा अधिवास वाढावा, यासाठी वनविभागाने हिरवे कुरण, फळ झाडांची लागवड करण्याबरोबर विश्रांतीसाठी थांबे देण्यात आले आहे. वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात भटकंती करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सौर ऊर्जेवरील हातपंप, पाणवठे, नैसर्गिक तलावांचे खोलीकरण करण्यात आले आहे. बफर झोनमध्ये वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष दिले जात असल्यामुळे शिकारींचा बंदोबस्त व वनातील आगींकडे लक्ष देण्यात येत असल्यामुळे वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
बौद्ध पौर्णिमेला झालेल्या प्रगणनेत बिबट ६, अस्वल ३३, ससा १, गवे ७८, रानडुक्कर २६४, चितळ २५५, नर निलगाय १४, निलगाय मादी व बच्चे २३, रानकुत्रे ४९, सांबर १२, मोर ९५, भेंडकी २०, मुंगूस २, सायाळ २, वानर २०२, रानमांजर २, मसण्याऊद ४, चौसिंगा २, खवल्या मांजर १ असे एकूण १०६५ प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

वन्यजीवांना आवश्यक ते नैसर्गिक वातावरण कोका वन्यजीव अभयारण्यात आहे. सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत व वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाली आहे.
-आशुतोष शेंडगे,
वनपरिक्षेत्राधिकारी कोका.

Web Title: Coca-Cola Sanctuary becomes a paradise for the wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल