Cemetery Slaughterhouse | स्मशानभूमीतील झाडांची कत्तल
स्मशानभूमीतील झाडांची कत्तल

ठळक मुद्देदुर्लक्ष : मौल्यवान वनसंपदेचा होतोय ऱ्हास, महसूलही पाण्यात

लोकमत न्युज नेटवर्क
भंडारा : शहराच्या पूर्व-दक्षिण क्षेत्रातील वैनगंगा नदीकाठाला लागून असलेल्या स्मशानभूमी परिसरातील वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असून या वृक्ष कटाईचा तस्करांना चांगलाच फायदा होत आहे.
भंडारा शहराच्या दक्षिण क्षेत्रात असलेल्या स्मशानभूमी परिसराची विस्तीर्ण जागा आहे. या स्मशानभूमीला लागूनच वैनगंगा नदीचे विशाल पात्र आहे. याच नदीकाठावर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी गणेशपूर ते कारधा स्मशानभूमीपर्यंतच्या भागावरील सुपीक मातीचे खणन केले जात होते. त्या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून महसूल विभागाला कारवाई करण्यास भाग पाडले होते. आता तस्करांची नजर येथे असलेल्या वृक्ष संपदेवर गेली आहे.
स्मशानभूमी परिसरात असलेली लहान मोठी झाडे कापण्याचा सपाटा सुरु असल्याचा नाव न सांगण्याच्या अटीवर नजीकच्या रहिवाशांनी सांगितले.
सदर कापलेली वृक्ष थेट तस्करी होत असल्याचेही दिसून येत आहे. या संदर्भात वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचेही जाणवते. वनसंपदेचा हा ऱ्हास पर्यावरण दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा असतानाही शासकीय संपत्तीच्या देखरेखीकडेही दुर्लक्ष होत आहे.
या परिसरातून कोट्यवधी रुपयांची ही वनसंपदा तस्करांकडून चोरली जात असताना कुणीही बोलायलाही तयार नाहीत.
जागरूक नागरिकांनी याची माहिती दिल्यावरही प्रशासन कारवाई करणार काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ऐरवी स्मशानभूमी परिसरात अंत्यसंस्कारासाठी नागरिक जात असतात. परिणामी याकडे सहसा कुणी लक्ष देत नसल्याने याचाच फायदा लाकुड तस्कर उचलत असल्याचेही दिसून येते.


Web Title: Cemetery Slaughterhouse
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.