धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:50 PM2017-11-22T23:50:41+5:302017-11-22T23:51:30+5:30

Burns of paddy | धानपीक जाळले

धानपीक जाळले

Next
ठळक मुद्देचिचोली येथील प्रकार : नापिकीमुळे शेतकरी त्रस्त

आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.
चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन मोटघरे, रघुनाथ समरत, मंगेश समरीत यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकावर प्रादुर्भाव होऊन पीक फस्त झाले आहे.
किडीमुळे यावर्षी एक रूपयाचेही धान मिळणे कठीण झाल्यामुळे रामदास नैताम व शालीक समरीत यांनी बुधवारला शेतातील धानपिक जाळून टाकले. असे असताना कृषी विभाग शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी न करता टेबलावर सर्वेक्षण करून अहवाल पाठवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकऱ्यांचे बळी गेले. कुठे तीव्र कीटकनाशकांच्या फवारणीमुळे जिवीतहानी तर कुठे फवारणीअभावी पीक हानी झाल्याचे वास्तव आहे. शेतकरी पिकांच्या संरक्षणार्थ विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहे मात्र पीक वाचविण्याच्या नादात त्याचाच मृत्यू झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. धान उत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे जीव जाईल या भीतीपोटी अनेकांनी फवारणी टाळली. फवारणी टाळल्याने अनेक भागात तुडतुडा या किडीसह अन्य किडीची लागण होऊन हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक नष्ट झाले आहे. धानपीकाच्या लोंबी भरल्या असताना किडीमुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला. उत्पादन खर्चावर आधारित धानाला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे. परिणामी कर्जबाजारी व नापिकीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला असतानाही धान उत्पादक शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधी बोलण्यासाठी तयार नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.
तुडतुडा या किडीमुळे हातात आलेले धानपिक नष्ट झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले आहे. प्रशासनाने आतातरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे यांनी केली आहे.

Web Title: Burns of paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.