Bhandara police helps ill young man from W.Bengal | प. बंगालमधून भरकटलेल्या आजारी युवकाला भंडारा पोलिसांनी दिला माणुसकीचा हात

ठळक मुद्देचार दिवस केली सेवा इंदुरखा येथील घटना

सिराज शेख।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पुण्यात नोकरीसाठी आलेल्या मात्र नंतर काही कारणास्तव भंडारा जिल्ह्यात भरकटत असलेल्या प. बंगालमधील एका युवकाला त्याचे नातेवाईक येईपर्यंत चार दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून देत भंडारा पोलिसांनी आपल्यातील माणुसकीचा सर्वांना परिचय दिला.
२७ नोव्हेंबरला सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान एक युवक संशयात्मकरित्या इंदुरखा येथे फिरत असल्याचे तेथील पोलीस पाटलांनी मोहाडी पोलिसांना सूचना दिली. अशा प्रकरणात गावकरी चांगलाच चोप देतात हे पोलिसांना चांगले ठाऊक असल्याने एकादी अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस तात्काळ तिथे पोहचले.
युवकाला आपल्या ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्याची विचारपूस केली असता त्याला हिंदी किंवा मराठी भाषा बोलता येत नव्हती. तसेच त्याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी अनेक उपाययोजना करून त्याचा पत्ता काढला असता तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिसांनी पश्चिम बंगाल राज्यातील मयूरेश्वर पोलीस ठाण्यात संपर्क करून त्या युवकाबद्दल माहिती दिली असता त्या युवकाचे नाव अयनुल बारी रा.गोचेपाडा, जिल्हा बिरभुम पश्चिम बंगाल असल्याचे समजले. त्यानंतर व्हाट्सअ‍ॅपच्या व्हीडीओकॉलींगद्वारे त्या युवकाची फोटो त्याच्या नातेवाईकांना दाखविली व त्या युवकाचे संभाषणही करून दिले. त्या युवकाला त्याच्या नातेवाईकांशी भेट करून देण्यासाठी पोलीस निरीक्षक एस.के. चव्हाण, ओमप्रकाश गेडाम, सुनिल केवटसह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहयोगाची भूमिका निभावली.

चार दिवसाचे आदरातिथ्य
च्हा युवक अनेक दिवसापासून उपाशी असल्याने व गावोगाव फिरत असल्याने त्याची मानसिक स्थिती खालावली होती. तो पुणे येथे कामासाठी आला होता. परंतु तेथून पळून जावून इकडे तिकडे फिरत होता. पोलिसांनी त्याला हाकलून न देता त्याच्या परिवाराचा शोध लावण्याचा विचार करून त्याला ठाण्यातच ठेवले. २७ ते ३० नोव्हेंबर पर्यंत त्याच्या राहण्याची व जेवणाची सोय केली. हा पुन्हा येथून पळून न जावो म्हणून त्याची दिवसा, रात्री रखवालीही केली. या चार दिवसात एखादे वेळ जेवणाला उशिर झाला तर तो पोलिसांवरच रागावायचा. त्याचा रागही मोहाडी पोलिसांनी सहन करून पोलिसही शेवटी माणूसच आहेत. त्यांच्यातही संवेदना असतात. परोपकाराची, माणुसकीची भावना असते हे या प्रकरणावरून दाखवून दिले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.