भंडारा शहरातील खुल्या मैदानावर रंगते मद्यपींची मैफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:41 AM2019-05-19T00:41:56+5:302019-05-19T00:42:19+5:30

शहराच्या विविध भागात असलेल्या खुल्या मैदानांना रात्री ‘ओपन बार’चे स्वरुप आले असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्यपींची मैफल रंगते. कोणत्याही मैदानावर नजर टाकल्यास दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. खाद्य पदार्थांचे रिकामे पॉकीट, प्लास्टीकचे ग्लास दिसून येतात.

 Alcoholic drinks on the open ground in Bhandara City | भंडारा शहरातील खुल्या मैदानावर रंगते मद्यपींची मैफल

भंडारा शहरातील खुल्या मैदानावर रंगते मद्यपींची मैफल

Next
ठळक मुद्देरिकाम्या बाटल्यांचा जागोजागी खच । उशिरा रात्रीपर्यंत सुरु असतो गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहराच्या विविध भागात असलेल्या खुल्या मैदानांना रात्री ‘ओपन बार’चे स्वरुप आले असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्यपींची मैफल रंगते. कोणत्याही मैदानावर नजर टाकल्यास दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. खाद्य पदार्थांचे रिकामे पॉकीट, प्लास्टीकचे ग्लास दिसून येतात. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असला तरी अद्यापर्यंत कारवाई झाली नाही.
भंडारा शहरात विविध भागात विस्तीर्ण मैदान आहे. या मैदानांचा उपयोग खेळासाठी आणि विरंगुळा म्हणून केला जातो. परंतु अलिकडे या मैदानाला भलतेच स्वरुप आले आहे. शहरातील वाईन शॉपमधून बॉटल खरेदी करून आणतात. सोबत खाद्य पदार्थांचे पॅकेट, पाण्याच्या बॉटल आणि प्लास्टीकचे रिकामे ग्लासही घेऊन येतात. सोबत सिगारेटचे पाकीटही असतात. ठिकठिकाणी सिगारेटचे थुटके पडून दिसतात. काही ठिकाणी तर चक्क गांजा ओढला जात असल्याची माहिती आहे. कुणाचीही आडकाठी नसल्याने या ठिकाणी उशिरा रात्रीपर्यंत चांगलीच मैफल जमते. यात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या तरुणांचा अधिक भरणा असतो. बारमध्ये बसल्यास वेळेचे बंधन असते. तसेच त्या ठिकाणी गोंधळ, आरडाओरडा करता येत नाही. विशेष म्हणजे बारमधील दारु वाईनशॉप पेक्षा महाग असते. त्यामुळे खुल्यावरच पार्टी रंगविण्याकडे या तरुणांचा कल असतो.
सकाळच्या वेळी नागरिक मैदानावर फिरायला जातात. तेव्हा मैदानावरील रिकाम्या बाटल्या दूर कराव्या लागतात. अनेकदा या बाटल्या फुटलेल्या असतात. त्यामुळे धारदार काचाने हात जखमी होण्याचीही भीती असते.

शहरातील मिशन ग्राउंड, शास्त्री पटांगण, हुतात्मा स्मारकासह रात्री लवकर सुनसान होणाऱ्या मैदानावर ओपन बार सुरु होतो. चारपाच टारगट तरुण एकत्र येतात आणि खुल्या मैदानात पार्टी रंगत जाते. या पार्टीला वेळेचे कोणतेही बंधन नसते. पहाटेपर्यंतही पार्टी रंगत असल्याचे काही भागात दिसून येते.

Web Title:  Alcoholic drinks on the open ground in Bhandara City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.