एका एकरात पिकविला ६० हजारांचा भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:19 PM2018-11-12T22:19:15+5:302018-11-12T22:19:35+5:30

अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.

60 thousand vegetables in a single area | एका एकरात पिकविला ६० हजारांचा भाजीपाला

एका एकरात पिकविला ६० हजारांचा भाजीपाला

Next
ठळक मुद्देशेततळ्याची किमया : चिखलाबोडीच्या सुमन सार्वे यांचा बहूपीक प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अपूरा पाऊस, सततचा दुष्काळ आणि त्यातून होणाऱ्या कमी उत्पन्नाने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. अशा परिस्थितीतही लाखनी तालुक्याच्या चिखलाबोडी येथील सुमन वामन सार्वे या महिलेने शेततळ्यातील संरक्षीत सिंचनाच्या सोयीने भरघोष उत्पन्न घेतले. ३६ क्विंटल धान, एका एकरात ६० हजाराचा भाजीपाला आणि मत्स्य व्यवसायातून २५ हजाराचा नफा कमविण्याची किमया त्यांनी साधली.
चिखलाबोडी येथे सुमन सार्वे यांची १.५८ हेक्टर शेतजमीन आहे. गतवर्षी पाऊस कमी झाल्याने आणि सिंचनाची सोय उपलब्ध नसल्याने सरासरी उत्पादकता फक्त २२ ते २३ क्विंटल प्रति हेक्टर एवढी झाली. अशातच त्यांनी मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत आपल्या शेतात शेततळे खोदले. पहिल्या पावसात शेततळे संपूर्ण भरल्याने शेतीची रोवणी योग्य वेळेवर करता आली.
पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून न राहता शेततळ्याच्या साथीने बहूपिक पध्दतीचा अवलंब केला. शेतात धान, तूर, भाजीपाला व शेततळ्यात मत्स्यपालनाचा निर्णय घेतला. याचा चांगला परिणाम आता दिसत असून त्यांचा वार्षिक उत्पन्नात वाढ अपेक्षीत आहे. सुमन सार्वे यांना गतवर्षी शेतीतून २० हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. पंरतु शेततळ्यातील सिंचनाने खर्च वजा जाता ४५ हजार रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षीत आहे.
यावर्षी त्यांना धानाचे ३६ क्विंटल हेक्टरी उत्पन्न झाले. तर एका एकरात ६० हजाराचे भाजीपाला उत्पादन घेण्यात आले. शेततळ्यामुळे सिंचनाची सोय झाल्याने त्यांनी कृषी विभागाकडून उपलब्ध झालेले सागाचे रोप व तूर पिकाची लागवड केली. शेततळ्यात वाघुर जातीचे मत्स्यबिज टाकले असून त्यातून २५ हजार रुपये नफा अपेक्षित आहे.
लाखनी तालुक्यात १४१ शेततळे
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी आणि तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त आहे. राज्यातील पावसावर आधारीत कोरडवाहू शेतीत जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे व संरक्षित श्वासत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. या योजनेतून लाखनी तालुक्यात जून २०१८ पर्यंत १४१ शेततळ्यांची कामे पुर्ण झाली असून संरक्षित सिंचनाची उपलब्धता निर्माण झाली आहे.

Web Title: 60 thousand vegetables in a single area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.