५ फेब्रुवारीला मतदान : ५० उमेदवारांची माघार, एका जागेसाठी अपील
लाखांदूर : तालुक्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ५ फेब्रुवारीला होणार आहे. १८ संचालक मंडळाच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर आता ४४ उमेदवार रिंगणात आहेत. ५० उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सत्तेत होते. त्यानंतर भाजपच्या प्रशासकांनी कारभार सांभाळला. आता निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होऊ घातली आहे.
दरम्यान, पणन व प्रक्रिया संघातून एका जागेची निवड करावयाची आहे. परंतु या संघातून सदाशिव खेत्रे यांनी जिल्हा निबंधकाकडे अपील केल्याने सध्या सदर संघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही. १९ जानेवारीला या जागेची उमेदवारी कायम करण्याबाबत निकाल घोषित करण्यात येणार आहे. त्याचदिवशी चिन्हांचे वाटप होणार आहे.
विविध गटातील मतदार संघातून १८ संचालकाच्या जागेसाठी ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात सर्वाधिक सेवा सहकारी संस्थामधून ११ संचालकांची निवड करावयाची आहे. यात सर्वसाधारण गटातून ७ जागेसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. इतर मागासवर्गीय गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, अनुसूचित जाती व जमाती गटातून १ जागेसाठी २ उमेदवार, महिला गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार, ग्रामपंचायत मतदार गटातून ४ संचालकाच्या निवडीसाठी २ जागा सर्वसाधारण गटासाठी असून यासाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. अनसूचित जाती, जमाती गटातून १ जागेसाठी २ उमेदवार तर आर्थिक दुर्बल गटातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. व्यापारी व अडते मतदार संघातून २ संचालक निवडायाचे असून यासाठी ४ उमेदवार तर हमाल व मापारी मतदार संघातून १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे. भाजपने खासदार नाना पटोले व आमदार बाळा काशिवार यांच्याकडे धुरा सोपविली असून ते आपल्या उमेदवारांचे नामांकन भरण्यापासून सहभाग घेत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याची रणनिती आखलेली आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने या दोन्ही पक्षाची ताकत वाढली आहे. लाखांदूर तालुक्यात बऱ्याच ग्रामपंचायती आणि सेवा सहकारी संस्था काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी गटबाजी न करता काम केले तर सत्ता मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र भाजपाचा बोलबाला असल्यामुळे खासदार नाना पटोले यांच्या रणनीतीवर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहील.
काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य राजकारणात ‘हमी भी कुछ कम नही’ असे म्हणत ही निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागले आहेत. १९ जानेवारीला उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरूवात होईल. निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक ए.के. मेंडुले आणि आर.एस. मते हे निवडणुकीचे काम पाहत आहेत. (तालुका प्रतिनिधी)