जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष : करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
युवराज गोमासे करडी (पालोरा)
करडी परिसरातील ७ गावांसाठी ४ कोटी रूपयांचा निधी खर्चून तयार करण्यात आलेली करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सन २०१२ पासून बंदस्थितीत आहे. ही योजना सुरू करण्याचे अनेकदा प्रयत्न झाले असले तरी प्रयत्न व्यर्थ ठरले. परिणामी नागरिक शुध्द पाण्यापासून वंचित आहेत. चार वर्षापासून कर्मचारी वेतनाविना आहेत. पाणी शुद्धीकरण यंत्रणा भंगारात निघाली आहे.
करडी परिसरातील ७ गावांना शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने करडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. या योजनेसाठी चार कोटी रूपयांचा निधी खर्च झाला. या योजनेत करडी, मुंढरी खुर्द, निलज खुर्द, निलज बुज, देव्हाडा, नरसिंगटोला, मोहगाव, नवेगाव आदी गावांचा समावेश होता. मात्र योजनेचा खर्च पेलणारा नाही, या कारणास्तव करडी गावाने योजनेतून नाव मागे घेतले. त्यामुळे उर्वरित लहान गावांच्या माथ्यावर योजना मारण्यात आली.
ही योजना सन २००९ मध्ये तयार होऊन सन २०११ पर्यंत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. अखेर २०१२ मध्ये लोकार्पण करण्यात आले. योजना सुरु होवून जेमतेम कालावधी लोटत नाही, तोच विद्युत बिल व देखरेखीचा मोठा बोझा पडल्याने निधीच्या उपलब्धतेअभावी योजना बंद पडली. पुन्हा निधीसाठी जिल्हा परिषदेने मदत दिल्याने योजना कार्यान्वीत झाली. परंतु पुन्हा महिन्याभरानंतर ४ कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी असहकार आंदोलन पुकारल्याने योजना बंद पडली, ती कायमचीच. त्यानंतर योजना सुरू झाली नाही.
बांधकाम होऊन तीन ते चार महिने सुरु राहिली. ही योजना बंद झाल्याने यंत्रणा भंगारात निघाल्यानंतर ही योजना सुरू करण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. तुमसर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी बावनकर यांनी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
परंतु उपयोग झालेला नाही. सन २०१२ मध्ये ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरित केल्याचे सांगण्यात आले. योजनेच्या संचालनासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत तत्कालीन उपसभापती उपेश बांते यांचे अध्यक्षतेखाली शिखर समिती गठित करुन योजना सुरु करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु शिखर समितीसुद्धा योजना चालविण्यात अपयशी ठरली.

चार गावांचे नुकसान
योजना ७ गावांसाठी तयार करण्यात आली. परंतु यातील तीन गावांनी खर्च झेपणारा नसल्याची बाब समोर केली आहे. निलज बुज, निलज खुर्द, मोहगाव, नवेगाव अद्यापही योजना सुरु करण्याची मागणी करीत आहेत. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवत अमानत रक्कम व नळ जोडणीसाठी बांधकाम करुन घेतले आहे. मात्र योजना सुरु करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पं.स. सदस्य महादेव पचघरे यांनी केला.
योजना सुरु करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेऊन ही मागणी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने चार कोटी रूपयांची योजना भंगारात निघाली आहे. शुद्ध पाण्यापासून नागरिक वंचित असल्याचे निलजचे सरपंच किशोर माटे यांनी सांगितले.