१२०० आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:06 AM2019-05-08T01:06:48+5:302019-05-08T01:07:54+5:30

आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे.

1200 tribal water pipelines | १२०० आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

१२०० आदिवासींची पाण्यासाठी पायपीट

Next
ठळक मुद्देयेदरबुची, सुंदरटोला येथील प्रकार : ४० विहिरींसह दोन तलाव कोरडे, खासगी विहीर भागवतेय तृष्णा

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आदिवासीबहुल गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० नागरिकांची तहान एका शेतातील विहीर भागवित आहे. अख्खे गाव पहाटे गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावरील विहिरीवर पाणी भरायला जात आहे. सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या असून सात हातपंपापैकी ५ हातपंपाला सध्या पाणी नाही. संपूर्ण गाव थेंब-थेंब पाण्याकरिता विहिरीवर सध्या प्रतीक्षा करीत आहे. बावनथडी प्रकल्प जवळ आहे. येथे धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती दिसत आहे.
तुमसर तालुक्यात बावनथडी, वैनगंगा अशा नद्या आहेत. तलावांची संख्या ही मोठी आहे. परंतु पाण्याचे नियोजन नसल्याने दरवर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. येदरबुची, सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात पाण्याकरिता दाही दिशा भटकावे लागत आहे.
सदर गावातील ४० विहिरी सध्या कोरड्या पडल्या आहेत. गावाशेजारी एक शासकीय व एक खासगी तलाव कोरडा पडला आहे.
सात हातपंप असून त्यापैकी पाच हातपंप कोरडे पडले आहेत. २५० ते ३०० फुट पर्यंत खोदकाम केल्यावरही पाणी लागले नाही. एका हातपंपातून अल्प प्रमाणात पाणी येते तर दुसऱ्या हातपंपाचे पाणी लालसर येत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. लोहखनीज तत्वाचा या पाण्यात समावेश अधिक आहे. गावापासून एक ते दीड कि.मी. अंतरावर शेतात एक विहिर असून तिथे समस्त ग्रामस्थ पाणी आणण्याकरिता भल्या पहाटे जातात. उर्वरीत ग्रामस्थांना थेंब थेंब पाणी जमा होईपर्यंत तीन ते चार तास प्रतीक्षा करावीलागते. अंधारात पाण्याकरिता अख्खे गाव येथे पायपीट करीत आहे.
सदर गावात पेयजल योजना कार्यान्वित असून जलकुंभ तयार करण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्पाला सदर पेयजल योजना जोडली आहे. ३० हजार लिटरचे जलकुंभ आठवड्यातून एकदाच अर्धे भरण्यात येत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल टेकाम व ग्रामस्थांनी दिली. मागील पाच वर्षापासून परिसरात दुष्काळ व पाणी टंचाई भेडसावत आहे. विहिरींचे खोदकाम करताना खाली दगड येथे लागतात.
सदर परिसर सातपुडा पर्वत रांगांत जंगलात वसला आहे. प्रशासनाच्या योजना केवळ कागदावर रंगवताना अधिकारी दिसतात, असा आरोप अनिल टेकाम यांनी केला आहे.

आदिवासी बहुल येदरबुची, सुंदरटोला येथील सुमारे १२०० ग्रामस्थ पाण्याकरिता वणवण भटकत असून रात्री अंधारात पाण्याच्या शोधात जातात. गावात पेयजल योजनेचा जलकुंभ पाणीपुरवठा करण्यास कुचकामी ठरला आहे. कोट्यवधींची योजनेचा लाभ काय? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. आदिवासी समाजाची उपेक्षा होत आहे.
-डॉ.पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर.
 

Web Title: 1200 tribal water pipelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.