ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार

माजलगांव ( बीड ), दि. १३ : तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. तसेच यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर देखील अतिरिक्त कामाचा ताण मोठया प्रमाणावर वाढला आहे. 

माजलगांव तालुका बीड जिल्हयातील सधन शेतक-यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील तालुका कृषी कार्यालयात मोठया प्रमाणावर शेतकरी विविध कामासाठी येतात. यासोबतच शेतक-यांना कृषी कर्मच्या-यांची फिल्डवरील अनेक कामांसाठी मदतची आवश्यकता असते. यात शेतक-यांना पिकांच्या संदर्भात योग्य माहिती देणे, नवनविन शेती औजारांबाबत शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मातीच्या गुणवत्तेनुसार कोणती पिके घ्यावीत या बाबत माहिती देणे तसेच इतर विविध प्रकारे शेतक-यांना माहिती पुरविणे त्यांच्या अडचणी दुर करणे तसेच शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोंच करणे अशी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, या कार्यालयात मागील दोन वर्षांपासुन कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे. मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार चालवावा लागतो. 

अपु-या कर्मच्या-यांवरच मदार  
यातच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतांना यातील अनेक कर्मचारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे शेतक-यांना आपली कामे करुन घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कार्यालयात तालुका कृषि अधिकारी 1 पद रिक्त आहे, मंडळ अधिका-यांच्या तीन जागा असुन तिनही जागा रिक्त आहेत, पर्यवेक्षकांच्या सात जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत, कृषि सहाययकाच्या 37 जागांपैकी 22 जागा रिक्त आहेत , कारकुनाच्या 2 जागांपैकी दोन्ही जागा रिक्त आहेत तर शिपायाच्या 5 जागांपैकी 3 जागा रिक्त आहेत. 

माजलगाव कृषि कार्यालयांतर्गत सद्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांपैकी ब-याच कर्मचा-यांकडे इतर ठिकाणचे देखील चार्ज आहेत त्यांना ज्या ठिकाणचे चार्ज आहेत तेथे देखील वेळ द्यावा लागतो त्यामुळे माजलगांवचे कार्यालय हे अत्यल्प कर्मचा-यांवर सद्या चालु असल्यामुळे कृषि कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. या ठिकाणी कर्मचा-यांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात येवून कारभार सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. 

आहे त्या कर्माचा-यांवर काम सुरु आहे 
कार्यालयाकडुन दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचा-यांबाबत अहवाल पाठविण्यात येतो. सध्या आम्ही आहे तेवढया कर्मचा-यांवरच कार्यालयाचे संपुर्ण काम करुन घेत आहोत.
- एस.एम. काळेल, प्रभारी तालुका कृषि अधिकारी 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.