रद्दीवाल्याच्या पोटी ज्ञानाचा खजिना ! रद्दीतील वह्या-पुस्तकांवर अभ्यास करत मिळवले अभियांत्रिकीत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:19 AM2019-01-21T00:19:23+5:302019-01-21T00:20:12+5:30

या घरातील लेकीने अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक मिळविले आहे.

Winnie the treasure of knowledge! | रद्दीवाल्याच्या पोटी ज्ञानाचा खजिना ! रद्दीतील वह्या-पुस्तकांवर अभ्यास करत मिळवले अभियांत्रिकीत सुवर्णपदक

रद्दीवाल्याच्या पोटी ज्ञानाचा खजिना ! रद्दीतील वह्या-पुस्तकांवर अभ्यास करत मिळवले अभियांत्रिकीत सुवर्णपदक

Next
ठळक मुद्देअनुष्का सोनवणेला अभियांत्रिकीचे सुवर्णपदक

- अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई (बीड ) : घरात पाचवीला पुजलेले दारिद्रय.. वडील रद्दी आणि भंगार गोळा करून संसाराचा गाडा हाकतात. तर आई मुकबधीर..घरात शिक्षणाचा कसलाही गंध नाही. अशा अनंत अडचणी बाजूला सरत रद्दीवाल्याच्या घरातील अस्सल सोने लख्ख उजळले आहे. या घरातील लेकीने अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून विद्यापीठातून प्रथम येत सुवर्णपदक मिळविले आहे.

अनुष्का दामोदर सोनवणे असे या गुणवान लेकीचे नाव आहे. बोधीघाट परिसरात राहणारे दामोदर यांना अनुष्का व अमिषा या दोन मुली असून त्यांना मुलगा नाही. काम केले तरच दिवस भागणार अशा अवस्थेत या कुटुंबाने दिवस काढले आहेत. गरिबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही याची कसर आपल्या मुलीला शिक्षण देऊन काढण्याच्या हेतूने हे दांपत्य आजही कष्ट घेत आहे. कुटूंबाच्या उदरिनर्वाहासाठी दामोदर यांनी काही काळ सायकल रिक्षा चालवला.

परंतु, त्या काळी बाजारात ऑटोरिक्षा आल्याने त्यांच्या सायकल रिक्षाला प्रवाशी मिळेना झाले. त्यामुळे त्यांनी हातगाड्यावर भंगार व रद्दी गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यांची पत्नी संगीता या मुकबधीर आहेत. त्याही शिलाईकाम करून कुटूंबाला जमेल तेवढा आर्थिक हातभार लावू लागल्या. या सर्व कष्टाच्या पैशातून दामोदर यांनी आपल्या मुलींना शिकवले. अनुष्काचे चौथीपर्यंतचे शिक्षण बोधीघाट येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत झाले. तर, माध्यमिक शिक्षण वेणुताई विद्यालय, बारावीचे योगेश्वरी तर अभियांत्रिकीचे शिक्षण बसवेश्वर महाविद्यालयात झाले.

गरिबीमुळे घरात कोणत्याही सुविधा नसताना व खाजगी शिकवणी लावू न शकलेल्या अनुष्काने पहिलीच्या वर्गापासूनच पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. तीच जिद्द आणि चिकाटी कायम ठेवत तिने अभियांत्रिकी परीक्षेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात प्रथम येत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

रद्दीतील पुस्तकांवर केला अभ्यास
अनुष्काचे वडील भंगार व रद्दी खरेदी करीत असताना लोक जुनी पुस्तके आणि अर्धवट वापर केलेल्या वह्या विकत असत. हे ते आपल्या मुलींना दाखवत असत. त्यातून उपयोगी असलेल्या पुस्तक व वह्यांवर अनुष्का व तिची बहीण अभ्यास करीत असत.

Web Title: Winnie the treasure of knowledge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.