गेवराईतील ‘त्या’ जुळ्या मुलींच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ कायम; पोलिसांचा तपास रखडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 03:39 PM2019-04-24T15:39:30+5:302019-04-24T15:42:22+5:30

११ दिवस उलटूनही तपास तिथेच

twin girl death case investigation is delayed | गेवराईतील ‘त्या’ जुळ्या मुलींच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ कायम; पोलिसांचा तपास रखडला 

गेवराईतील ‘त्या’ जुळ्या मुलींच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ कायम; पोलिसांचा तपास रखडला 

Next

बीड : गेवराई तालुक्यातील काठोडा तांडा येथे एकाचवेळी दोन मुलींचा मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाने शंका उपस्थित केल्यानंतर पोलिसांनी महिन्यानंतर  प्रेत उकरून उत्तरीय तपासणी केली होती. यात ११ दिवस उलटले तरी अद्याप काहीच तपास झालेला नाही. त्यामुळे मृत्यूप्रकरणाचे गूढ अद्यापही कायम आहे. डॉक्टर व पोलिसांच्या दिरंगाईमुळे हा तपास रखड्याची चर्चा आहे.

जिल्हा रुग्णालयात गेवराई तालुक्यातील एका महिलेने २५ फेब्रुवारी २०१९ रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला होता. ३ मार्च रोजी सुटी झाल्यानंतर  माता व मुलींना घरी पाठविण्यात आले होते. १३ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर दोन्ही मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. मात्र, नातेवाईकांनी याची माहिती कोणालाही न देता गुपचूप अंत्यविधी उरकला होता. आठवड्यानंतर गावातील आशा सेविका लस देण्यासाठी घरी गेल्या तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला होता.

दरम्यान, अनिता चव्हाण  यांना आधीच दोन मुली असून  तिसऱ्यावेळी त्यांची घरीच प्रसूती झाली, तेव्हादेखील त्यांनी मुलीला जन्म दिला होता; परंतु मुलगी जन्मानंतर काही वेळातच मृत्युमुखी पडली होती.  जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू कसा काय झाला? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याने आरोग्य विभागाने शवविच्छेदनाची मागणी केली होती. त्यानुसार १३ एप्रिल रोजी दोन्ही मुलींचे प्रेत उकरुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र, मुली जन्मानंतर दोन आठवड्यातच गतप्राण झाल्याने उत्तरीय तपासणीतून मृत्यूमागील कारणाचा उलगडा होऊ शकला नाही. पोलिसांनी दोन्ही मुलींचा व्हिसेरा राखून ठेवला होता. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहे. मात्र, अद्याप अहवाल प्राप्त नसल्याने पोलीस प्रशासन कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलेले नाही.

११ दिवस उलटूनही तपास तिथेच
या घटनेला ११ दिवस उलटून गेले आहेत. डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त न झाल्याने पोलिसांचा तपास थांबल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांकडून हा अहवाल देण्यास दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे. 

अहवाल आलेला नाही 
शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. गुरूवारी डॉक्टरांनी बोलावले आहे. अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाईल. अहवाल नसल्याने आम्हाला काहीच तपास करता येत नाही. अहवालाबाबत आमच्या हाती काहीच नाही. 
- आर.मुऱ्हाडे, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे तलवाडा

Web Title: twin girl death case investigation is delayed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.