सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:06 AM2019-03-24T00:06:17+5:302019-03-24T00:06:52+5:30

दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत.

Theft mobile found near retired police | सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल

सेवानिवृत्त पोलिसाजवळ सापडला चोरीचा मोबाईल

Next
ठळक मुद्देएलसीबीच्या तपासातून उघड : मोबाईल चोरला नसून सापडल्याचा कांगावा

बीड : दोन वर्षापूर्वी बसस्थानकातून चोरी गेलेला मोबाईल शिवाजीनगर ठाण्यातील निवृत्त सहायक फौजदाराजवळ सापडला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करून संबंधित पोलिसाला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ही कारवाई सपोनि अमोल धस व त्यांच्या चमूने केली. आपण मोबाईल चोरला नसून तो सापडल्याचा कांगावा हा पोलीस करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.
रमेश विश्वनाथ गायकवाड (६० रा.गोविंदनगर, बीड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या निवृत्त सहायक फौजदाराचे नाव आहे. २०१७ साली एका व्यक्तीचा बीड बसस्थानकातून एक महागडा मोबाईल चोरीला गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला. शिवाजीनगर पोलिसांनी याचा तपास करण्यास अनुत्सुकता दाखविली. यावेळी याच ठाण्यात रमेश गायकवाड सुद्धा कार्यरत होते. मोबाईल सापडत नसल्याने शिवाजीनगर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांच्या मागावरच होती. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हा चोरीचा मोबाईल सुरू झाल्याचे सपोनि अमोल धस यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ सापळा लावत मोबाईलमध्ये टाकलेल्या सीमकार्डवर कॉल केला. काहीतरी कारण सांगून त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेतले आणि खात्री पटताच बेड्या ठोकल्या. गायकवाड यांच्याकडून मोबाईलसह सीमकार्ड जप्त केले आहे. त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोउपनि मोहंमद काझी हे तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस व त्यांच्या चमूने केली. दरम्यान, एलसीबीकडून गायकवाड यांचा चोरट्यांशी संबंध आहे का, याचा तपास केला जात आहे.
जमा का केला नाही ?
गायकवाड यांनी आपल्याला हा मोबाईल बसस्थानकात सापडल्याचे सांगितले आहे. मात्र जर तो सापडला होता तर ठाण्यात जमा का नाही केला, त्यात सीमकार्ड का टाकले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे पोलीस असल्यामुळे यातील चांगल्या वाईट परिणामांची त्यांना जाणीव असूनही त्यांनी हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
पोलिसांची प्रतिमा मलीन
आष्टी येथील बाळू खाकाळ खून प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने आरोपींना सहकार्य केल्याने सात वर्ष कारागृहात काढले. शेवटी तो त्यातून निर्दाेष सुटला. त्यानंतर आता गायकवाड नामक स.फौजदाराजवळ चोरीचा मोबाईल मिळाला आहे. अशा घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत चालली आहे.

Web Title: Theft mobile found near retired police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.