‘तात्या गँग’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:42 AM2019-01-28T00:42:54+5:302019-01-28T00:43:06+5:30

बँकेतून रक्कम काढल्यानंतर ती दुचाकीच्या डिकीत ठेवताच संधी साधून ती लुटणाऱ्या ‘तात्या गँग’च्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

'Tatti Gang' arrested | ‘तात्या गँग’ गजाआड

‘तात्या गँग’ गजाआड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बँकेतून रक्कम काढल्यानंतर ती दुचाकीच्या डिकीत ठेवताच संधी साधून ती लुटणाऱ्या ‘तात्या गँग’च्या बीड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे दोन वाजता बीड बसस्थानका परिसरात केली. गँगमधील चार आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून रोख दोन लाख रूपये आणि एक कार असा सहा लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
नारायण उर्फ तात्या माधवराव गायकवाड (५४ रा.खोकरमोहा ता.शिरूर), विलास नारायण पवार (३३), अमोल शिवाजी मासळकर (२३) व अमोल बाबासाहेब गित्ते (२३ सर्व रा.पाथर्डी ता. जि.अहमदनगर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी प्रजासत्ताक दिन साजरा झाल्यानंतर बीड पोलिसांकडून शहरात गस्त सुरू होती. रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांना तात्या गँग बीडमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यांनी बसस्थानक परिसरात सापळा लावून गँगच्या मुसक्या आवळल्या. या चारही आरोपींना पेठबीड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस, साजिद पठाण, संतोष म्हेत्रे, सखाराम पवार, बाबासाहेब डोंगरे, मुंजाबा कुंवारे, विष्णू चव्हाण, गणेश हंगे, भागवत बिक्कड, प्रदीप सुरवसे, नरेंद्र बांगर, रामदास तांदळे आदींनी केली.
‘तात्या’च टोळीचा मास्टरमार्इंड
तात्या गायकवाड हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याने अनेक गुन्हेगार निर्माण करून गंभीर गुन्हे केलेले आहेत. लुटमार कशी करायची, याची शिकवण तात्याच देतो. तोच या टोळीचा म्होरक्या आहे. तर गित्ते हा डिकी तोडण्यात तरबेज आहे.
बँकेपासूनच पाठलाग
एखाद्या व्यक्तीने बँकेतून पैसे काढताच त्याचा पाठलाग केला जातो. कोणीत व्यक्ती पैसे डिकीत ठेवतो, याकडे लक्ष असते. त्यानंतर त्या व्यक्तीचा पाठलाग केला जातो. कोणत्याही कारणास्तव ती व्यक्ती थांबताच मन विचलित करून डिकी तोडून रक्कम लंपास करण्याची ‘मोडस’ या टोळीची असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लुटमारीच्या पैशांची ‘छमछम’वर उधळपट्टी
लुटमार केल्यानंतर मिळालेल्या पैशातून चोरटे चांगलीच ऐश करीत असल्याचे समोर येत आहे. तात्या गँगही यामध्ये कमी नव्हती. तात्यासह त्याच्या साथीदारांनी या पैशांची कलाकेंद्रात जाऊन उधळपट्टी केल्याचे सूत्रांनी सांगितले. तर गित्ते याने जुगारावर पैसे घातले.
टोळीचा मराठवाड्यात धुमाकूळ...

तात्या गँगने बीडसह मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे. या टोळीत आणखी चौघे असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तपासातून परजिल्ह्यातीलही गुन्हे उघडकीस येऊ शकतात.

Web Title: 'Tatti Gang' arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.