सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:43 PM2019-02-18T19:43:43+5:302019-02-18T19:48:11+5:30

खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Suicide committed by sun in law | सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या

सासुच्या जाचास कंटाळून जावयाने केली आत्महत्या

Next

केज (बीड ) : सासूसह पत्नीच्या त्रासास कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील सारुळ येथे रविवारी घडली. राजुद्दीन मैनोदिन सय्यद (34) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. खिशात सापडलेल्या सुसाईड नोट वरून पत्नी आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील सारुळ येथील रहिवासी राजुद्दीन मैनोदिन सय्यद हे शेतकरी असून त्यांची गावातच शेती आहे. मात्र त्यांची सासू आणि पत्नी त्यांना शहरात जाऊन काम करण्याचा तगादा लावत असत. केज येथे कामास आल्यानंतर सासू लातूर येथे कामास येण्याचा तगादा लावत अपमानास्पद वागणूक देत असे. लातूर येथे जाण्याची इच्छा नसल्याने त्यांची पत्नी आणि सासू सोबत नेहमी वाद होत असत. यातच मुलासोबत माहेरी जाऊन तुमच्या विरोधात दावा दाखल करण्याची धमकी पत्नीने दिली. तसेच वडील भेटण्यासाठी आले असता सासू आणि पत्नीने वाद घालत राजुद्दीनला मारहाण केली. या बाबत त्यांनी केज पोलीस तक्रार दाखल केली होती. 

यानंतर रविवारी ( दि. 17) राजुद्दीन सय्यद हे सारुळ येथे आपल्या शेतात आले आणि त्यांनी झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी पोलिसांना त्यांच्या जवळ सुसाईड नोट आढळून आली. यात, " माझी पत्नी व सासु यांनी मला आजपर्यत खुप त्रास दिला आहे. माझी सासु सतत माझ्या सोबत भांडण करुन पत्नीला माझ्यापासून दूर घेऊन जात असे व माझ्या कुंटुबीयांना ही त्रास देत असे. या पुढे माझ्या कुंटीबीयांना ती त्रास देऊ शकत नाही" अशा आशयाचा मजकूर आढळून आला. राजुद्दीनचे वडिल मैनुद्दीन सय्यद यांनी मुलाच्या सासु व पत्नी विरोधात केज पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी सासु व पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार सुरेश माळी व जमादार मुकुंद ढाकणे हे करत आहेत.

Web Title: Suicide committed by sun in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.