तीन एजन्सी बदलूनही रस्ता अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:50 PM2019-03-10T23:50:03+5:302019-03-10T23:50:41+5:30

परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गावर राष्ट्रीय कल्याण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत १३४ कोटी रुपये खर्च करून १८ किलोमीटरच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे काम गेले तीन वर्षांपासून चालू आहे.

Roadwork incompelete even after changing the three agencies | तीन एजन्सी बदलूनही रस्ता अर्धवट

तीन एजन्सी बदलूनही रस्ता अर्धवट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गावर राष्ट्रीय कल्याण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत १३४ कोटी रुपये खर्च करून १८ किलोमीटरच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे काम गेले तीन वर्षांपासून चालू आहे. परंतु या कामासाठी दोन्हीबाजूचे रस्ते खोदून ठेवले असून, संबंधित एजन्सीमार्फत हे काम संथगतीने चालू आहे. गेल्या २२ दिवसांपासून रस्त्याचे काम बंद असून, कामावरील यंत्र सामुग्रीही या ठिकाणाहून दुसरीकडे हलविली आहे. त्यामुळे या रस्त्यावर धुरळाच धुराळा उडत आहे. या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे तर धोक्यात आलेच आहे शिवाय रस्त्याची दुरवस्था झाल्याने ये-जा करणाऱ्या दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शंकर पार्वतीनगर, प्रियानगर, श्रीगणेशनगर, बँक कॉलनी, कन्हेरवाडी या भागातील नागरिकांनी रविवारी सकाळी ९ वाजता या रस्त्यावरील शंकरपार्वतीनगरच्या कमानीजवळ रास्ता-रोको आंदोलन सुरु केले. हे आंदोलन दुपारी ३ वाजेपर्यंत चालले. सहा तास रास्तारोको आंदोलन केल्याने परळी-अंबाजोगाई मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. या मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेस व इतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे घर याच मार्गावर असल्याने तेही या आंदोलनात धुळीच्या त्रासामुळे सहभागी झाले. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनीही भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन संपर्क केला. हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन खा. मुंडे यांनी यावेळी दिले.
परळीच्या नायब तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनीही आंदोलनस्थळास भेट देऊन हे काम दोन दिवसांत सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आंदोलकांनी जाहीर केले. रस्त्यावर धुरळाच-धुरळा झाल्याने तातडीने पाण्याचे टँकर आणून पाणी मारण्यात आले. आंदोलक घरी गेल्यानंतर मात्र रस्त्यावर पाणी मारणे बंद झाले.
परळी-अंबाजोगाई मार्गावरील परळी-पिंपळा धायगुडा हा डांबरीकरणाचा रस्ता खोदून त्या ठिकाणी सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे काम सुरु असून, या मार्गावरील एकही बाजू पूर्ण झालेली नाही. जे काम झाले तेही निकृष्ट झाले. त्यामुळे धुळीचे प्रमाण वाढल्याने या परिसरातील नागरिक वैतागून गेले. या मार्गावरून येणाºया-जाणाºया दुचाकीस्वारांचे एसटी महामंडळाच्या वाहन चालकांचे कंबरडे खराब व्हावे अशी स्थिती निर्माण झाली. या मार्गावर अनेक अपघात झाले त्यात काहीजणांचे बळी गेले, काहीजण जखमी झाले. त्यामुळे जनतेत निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका उडाला आणि नागरिकांनीच हे आंदोलन हातात घेऊन सहा तास रास्ता रोको केला. याची दखल खा. मुंडे यांना घ्यावी लागली. धनंजय मुंडे यांनीही दखल घेत आंदोलनात सहभाग नोंदविला.
या रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रियानगर भागातील सुचिता पोखरकर यांनी दिली. तीन वर्षांपासून हे काम रखडल्याने त्रस्त असल्याचे शंकर कापसे व दिलीप जोशी यांनी सांगितले. आंदोलनात पाचशेवर नागरिक सहभागी झाले होते. बिना पक्षाचे व बिना नेत्याचे पहिलेच हे आंदोलन ठरले. नागरिकांनीच या आंदोलनात पुढाकार घेतला.
रस्त्याचे काम न झाल्यास मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरत रस्ता कामासाठी निधी वाढवून देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील शेकडो किमीचे रस्ते पूर्ण झालेले असताना हाच रस्ता कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे रखडल्याने जनतेचे हाल झाले. कंत्राटदारावर कारवाई होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
कंत्राटदारांमुळे असंतोष
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी या कामाची एजन्सी असलेल्या सुनील हायटेक कंपनीला काही दिवसात अल्टीमेटम दिला होता. परंतु सुनील हायटेक हे काम करण्यास असमर्थ ठरले.
त्यामुळे दुस-या सबएजन्सीला काम दिले. त्या एजन्सीने हे काम केले नाही त्यामुळे तिस-या एजन्सीने हे काम हाती घेतले.
तिस-या एजन्सीने २२ दिवसांपासून हे काम बंद ठेवले. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

Web Title: Roadwork incompelete even after changing the three agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.